बीड जिल्हा अतिसंवेदनशील जाहीर करा : धनंजय मुंडे

बीड जिल्हा अतिसंवेदनशील जाहीर करा : धनंजय मुंडे

मुंबई ‌नगरी टीम

मुंबई : बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने काम करीत असल्यामुळे बीड जिल्ह्यात निर्भीड आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका होणार नाहीत त्यामुळे निवडणूक आयोगाने यात लक्ष घालावे अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

या निवडणुका भयमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांची तातडीने बीड जिल्ह्याच्या बाहेर बदली करावी अशी मागणीही मुंडे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक हेही उपस्थित होते.

बीड लोकसभेची निवडणुक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जिल्ह्याचे पोलीस प्रशासन निष्क्रियेतेने व सत्ताधार्‍यांच्या मर्जीने काम करीत असल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याबरोबरच जिल्ह्यातील जनतेच्या मनात भयग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे.

भाजपा उमेदवार प्रितम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेणार्‍या काँग्रेस कार्यकर्त्यास जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीसांसमक्ष मारहाण करण्यात आली. यातील आरोपींना तातडीने जामीन ही देण्यात आला. राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंगबप्पा सोनवणे यांच्या उमेदवारी अर्ज भरतानाच्या वेळच्या सभेलाही सत्ताधार्‍यांच्या दबावापोटी जागा मिळु दिली नाही. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पत्नीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते सोशल मिडीयातून मोठ्या प्रमाणावर धमक्या देत आहेत. याच पार्श्वभूमीवर सदर तक्रार करण्यात आली.

जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक व पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या आशीर्वादामुळे व निष्क्रियेतेमुळे या गंभीर घटना घडत असल्यामुळे त्यांची तातडीने बदली करावी, जिल्हा अतिसंवेदनशील म्हणुन घोषित करावा, स्थानिक पोलीसांचे सत्ताधार्‍यांशी असलेले लागेबांधे पाहता बाहेरील पोलीसांची कुमक बंदोबस्तासाठी ठेवावी , राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार व कुटुंबियास पोलीस संरक्षण द्यावे आदी मागण्याही त्यांनी केल्या.

Previous articleअसले फितूर वाघ असू शकत नाहीत :अजित पवार
Next articleकमी गर्दीमुळे मोदी आणि भाजपच्या पायाखालील वाळु सरकली