श्रीकांत शिंदे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील!
मुंबई नगरी टीम
ठाणे : शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना गेल्या निवडणुकीत तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने तब्बल अडिच लाखांचे मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर गेल्या पाच वर्षांत त्यांनी मतदारसंघात केलेली कामे आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची कामगिरी यामुळे येत्या निवडणुकीत ते विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास शिवसेना नेते व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी येथे व्यक्त केला.
श्रीकांत शिंदे यांच्या कळवा येथील जयभारत स्पोर्ट्स क्लब येथील निवडणूक जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपनेते दशरथ पाटील, नगरसेवक उमेश पाटील, राजेंद्र साप्ते, मनोज लासे, गणेश कांबळे, अनिता गौरी, पूजा करसुले, प्रियांका पाटील, माजी उपमहापौर अशोक भोईर, गणेश साळवी, मनोहर सुगधरे, राजेश विराळे आदी उपस्थित होते.डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना हजारो कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे. महायुतीच्या विरोधात ५६ पक्ष एकत्र आले आहेत. पण गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारने केलेली कामगिरी लोकांच्या समोर असल्यामुळे यंदाही मोदीजींच्याच नेतृत्वाखालील सरकार येणार, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
डॉ. श्रीकांत शिंदे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांनी केले. श्रीकांत शिंदे यांच्या रुपाने दिल्लीत आपला प्रतिनिधी असेल आणि विकासाला अधिक चालना मिळेल, असे ते म्हणाले.अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण ग्रामीण येथील जनसंपर्क कार्यालयांचेही उद्घाटन बुधवारी करण्यात आले. गेल्या पाच वर्षांत अंबरनाथची ओळख बदलण्यास सुरुवात झाली असून येथील विविध विकासकामे, तसेच सांस्कृतिक उपक्रमांमुळे सांस्कृतिक नगरी अशी अंबरनाथची नवी ओळख निर्माण होत असल्याचे प्रतिपादन डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ येथे केले.
उल्हासनगर येथील सिंधी समाजाचा वाढता पाठिंबा डॉ. श्रीकांत शिंदे यांना मिळत असून शहरातील सर्व सिंधी शाळा व महाविद्यालयांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बुधवारी डॉ. शिंदे यांनी सिंधी बांधवांशी संवाद साधला. शिवसेना-भाजप-रिपाइं महायुती नेहमीच सिंधी बांधवांसोबत राहिली आहे. हिरद्वार येथील सिंधी बांधवांच्या धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी रेल्वेने ऐनवेळी तांत्रिक कारणामुळे हरिद्वार एक्स्प्रेस ही गाडी रद्द केली होती. त्यावेळी सिंधी बांधवांची अडचण समजल्यानंतर रेल्वेमंत्र्यांशी बोलून पर्यायी गाडी सोडण्यात आल्याचे डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे, या उत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर सिंधी बांधव हरिद्वारला जात असल्यामुळे आपल्या विनंतीनुसार ही गाडी कायमस्वरुपी २४ डब्यांची करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. शहरातील व्यापारी, उद्योजक आणि कारखानदारांचे प्रश्न मार्गी लावण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.