आघाडीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी
मुंबई नगरी टीम
माजलगाव : देशात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन आम्ही जाहीरनाम्यात दिले आहे. मोदी सरकारने वर्ष भागात सहा हजार रुपये देण्याची फसवी घोषणा केली आहे आम्ही मात्र या देशातील प्रत्येक महिन्याला सहा हजार रुपये याप्रमाणे वर्षाला ७२ हजार रुपये देऊ त्यासाठी आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना विजयी करा असे आवाहन विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केले आहे.
बीड लोकसभेचे आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ धनंजय मुंडे यांच्या आज डोंगर पट्ट्यात झंझावती पाच सभांचे आयोजन करण्यात आले आहे . वडवणी तालुक्यातील उपळी येथील पहिल्या सभेत बोलताना त्यांनी काँग्रेस आघाडी सरकारने जाहीरनाम्यात दिलेल्या वचनांची माहिती दिली .
या सभेला माजी मंत्री प्रकाश दादा सोळंके काँग्रेसचे अशोक हिंगे, उमेदवार बजरंग सोनवणे, मोहनराव काका सोळंके, सर्जेराव काळे, अशोकराव डक, अशोकराव हंगे, जयसिंग सोळंके यांच्यासह आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
फडणवीस सरकारने केलेली कर्जमाफी फसवी निघाली एकाही शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळाला नाही. आम्ही मात्र देशात आघाडीचे सरकार आले तर या देशातील प्रत्येक शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत मोदी सरकारने निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे ही घोषणा केवळ निवडणुकीसाठी आणि मतं मिळवण्यासाठी आहे , अनेक ठिकाणी दिलेले दोन हजार रुपये काढून घेतले आहेत निवडणूक झाली की योजना ते बंद करतील आम्ही मात्र देशातील गरिबाला वर्षाला ७२ हजार रुपये याप्रमाणे महिन्याला सहा हजार रुपये देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काल अंबाजोगाई येथे झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी जातीवर नाही तर विकासावर बोला असे आवाहन केले होते . त्याचा संदर्भ देताना मुख्यमंत्री महोदय हा सल्ला तुमच्या उमेदवार आणि पालकमंत्र्यांना द्या बोलण्यासारखा कोणताही विकासाचा मुद्दा नसल्यानेच त्या फक्त जातीयवादावर बोलत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
डोंगरपट्ट्यातील जनता गरीब असली तर स्वाभिमानी आहे, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने काढलेले ऊसतोड कामगार महामंडळ बंद करून केलेला अपमान ते कदापि विसरणार नाहीत असे माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके म्हणाले.बीडच्या खासदार ५ वर्षात ५ वेळा ही जिल्ह्यातील जनतेला दिसल्या नाहीत मला संधी मिळाली तर मी ५ वर्षात जिल्ह्यातील प्रत्येक गावाला ५ वेळा भेट देईल, जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालय सुरू करेल, आठवड्यातून एक दिवस तालुक्याच्या ठिकाणी थांबेल असा शब्द उमेदवार बजरंग सोनवणे यांनी दिला. या सभेस मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते.