सिंचन घोटाळा करणा-यांनी  एक तरी बंधारा दिला का?

सिंचन घोटाळा करणा-यांनी  एक तरी बंधारा दिला का?

मुंबई नगरी टीम

आष्टी :  राष्ट्रवादीच्या डोळ्यात बिब्बा पडला असल्याने त्यांना आम्ही केलेला विकास दिसत नाही. त्यामुळे ते आमच्यावर बेछूट आरोप करत असून या पक्षाचे नाव आता बुद्धी भ्रष्टवादी असे ठेवण्याची वेळ आली आहे. एकत्र घराचा दाखला देणाऱ्या शरद पवारांनी कॉंग्रेस फोडून राष्ट्रवादी निर्माण केली. पण आमच्या भावाच्या पायगुणामुळे त्या पक्षाची वाट लागली असून हा पक्ष जन्मात सत्तेवर येणार नाही. हे केवळ घरे फोडण्यात तरबेज आहेत अशी जोरदार टीका पंकजा मुंडे यांनी कडा येथील सभेत केली.

शरद पवारांच्या कालच्या आष्टीतील सभेनंतर कडा येथे आज भाजपा महायुतीच्या उमेदवार डाॅ प्रितम मुंडेच्या प्रचारार्थ  पंकजा मुंडे यांची अभूतपूर्व अशी सभा झाली. या सभेत अपेक्षेप्रमाणे जोरदार फटकेबाजी करत त्यांनी राष्ट्रवादीवर तुफान फटकेबाजी केली. सभेस मोठा जनसागर उसळला होता. अतिभव्य झालेल्या सभेस मंत्री महादेव जानकर, आ. सुरेश धस, आ. भीमराव धोंडे, आदी उपस्थित होते.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, मुंडे साहेबांनी बीड जिल्ह्याची नाडी ओळखली होती. त्यानंतर ती कला माझ्याकडे आली आहे. केंव्हा आणि कुठे कोणते औषध द्यावे लागते ते मला बरोबर कळते. माझ्या उपचारांमुळे आ. सुरेश धस, मोहन जगताप आणि आता जयदत्त क्षीरसागर ही मातब्बर मंडळी आज आपल्या बाजूने आहेत. पण या उपचारांनी भाजप धष्टपुष्ट झाली, पण राष्ट्रवादी मात्र मरगळली. त्यांच्यात लढण्याची शक्तीच राहिली नसल्याने जातीपातीचे टॉनिक घेऊन निवडणुकीत जान आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. पण जिल्ह्यातील जनता सुजाण आहे, ती जात आंधळ्यांना त्यांची जागा दाखवून देईल. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या आमच्या भावाने तर मयत व्यक्तींच्या सुद्धा जमिनी लाटल्या. स्वतःवरून जग ओळखत असल्याने त्यांना सर्वजण ‘खातात’ असे त्यांना वाटतात. पण ‘खाण्यात’ तर त्यांची पीएचडी आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा करणारांनी तुमच्या भागात एकतरी बंधारा दिला का? आम्ही जलयुक्तच्या माध्यमातून सर्वत्र बंधारे दिले, पाणी अडवून जिरवण्याचे काम केले. ही तर सुरुवात आहे, भविष्यात कृष्णेचे पाणी आणून बीड जिल्हा सुजलाम सुफलाम करू. तुमच्या भागासह जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतींना कुठलाही भेदभाव न ठेवता कोट्यावधींचा निधी दिला. शहरी भागासह खेड्यापाड्यातील प्रत्येक व्यक्तीचा सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. माणसांसोबत आम्ही जनावरांचीही काळजी घेतली. मागील वर्षी बीड जिल्ह्यात ८१ छावण्या होत्या, आज साडेआठशे छावण्या आहेत. जनावरांना मतदानाचा अधिकार असता तर प्रीतमताईला प्रचाराची गरजच नव्हती, त्या असेच निवडून आल्या असत्या असे प्रतिपादन पंकजा मुंडे यांनी केले.

ऊसतोड महामंडळावरून माझ्यावर टीका करणारे आमचे भाऊ थापा मारतात. ते सांगतात त्याप्रमाणे मी कशावरही सही केली नाही, याऊलट मुंडे साहेबांच्या नावाने ऊसतोड कामगारांसाठी योजना सुरू करून शंभर कोटीची तरतूद करून घेतली, त्यांच्या मजूरीतही वाढ करून दिली. कामगारांच्या पुढची पिढीवर ऊस तोडण्याची वेळ येऊ नये यासाठी आम्ही वातावरण तयार करत आहोत. ऊसतोड कामगारांवर आता बेगडी प्रेम दाखविणा-यांनी सत्ता होती त्यावेळी काय त्यांच्यासाठी काय केले असा सवाल त्यांनी केला.

धस, धोंडे, दरेकर हे तीन ‘डी (थ्री-डी) आता आमच्याकडे आहेत. प्रचंड जनाधार असलेले हे तिन्ही नेते प्रीतमताईंना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ताईंचा विजय निश्चित आहे. या तीन ‘डी’ चा ‘थ्री-डी सिनेमा आपल्यालाही पहायचा आहे आणि विरोधकांनाही दाखवायचा आहे असे पंकजा मुंडे म्हणाल्या. पाटोद्यात आम्ही सभा घेतली नाही याचे भांडवल केले जात आहे. वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत. परंतु, पाटोद्यावर आमचे विशेष प्रेम आहे. त्यामुळे आम्ही पाटोदा विजयी सभेसाठी राखीव ठेवले आहे. निकाल लागल्यानंतर प्रीतमताईंची विजयी सभा पाटोद्यात घेण्यात येईल असे आश्वासन  पंकजा मुंडे यांनी दिले.

Previous article‘भाभीजी घर पर है’ आणि ‘तुझसे है राब्ता’च्या निर्मात्यांना सक्त ताकीद
Next articleभुजबळ कुटुंब रंगलय प्रचारात…