कळव्यात डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराचा झंझावात
मुंबई नगरी टीम
ठाणे : शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांची झंझावाती प्रचारफेरी बुधवारी कळवा परिसरात पार पडली.मुकुंद कंपनीपासून सुरू झालेली ही प्रचारफेरी आनंद नगर, वाघोबा नगर, दुर्गामाता मंदिर, सचिन म्हात्रे कार्यालय, निर्मलादेवी प्रवेशद्वार,महालक्ष्मी चाळ, कळवा हिंदी स्कूल, भास्कर नगर, शंकर मंदिर, समता चाळ, अष्टविनायक चाळ, अधिकार चौक, मस्जिद चौक, शिवसेना शाखा मार्केट, पौडवाडा नाका, पौडवाडा शाखा ८२, म. पा. शाळा, आतकोनेश्वर नगर नंबर १/२, शिवशक्ती नगर, इंदिरा नगर, घोलाईनगर,अपर्णाराज सोसायटी, आनंद विहार, न्यू शिवाजी नगर, ठाकूर पाडा अशा सर्व मार्गांवरून जाताना तिला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
याप्रसंगी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, महापौर मीनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते, नगरसेवक उमेश पाटील, पुजा करसुळे, प्रियंका पाटील, माजी नगरसेवक गणेश साळवी, विभागप्रमुख अविनाश पाटील, विजय शिंदे, महिला आघाडी जिल्हा संघटक लता पाटील आदी पदाधिकारी, तसेच शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कल्याण येथील डॉक्टरांच्या विविध संघटनांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला आहे. डॉ. शिंदे यांच्या समर्थनार्थ कल्याण पूर्व येथे डॉक्टरांच्या संघटनांनी बुधवारी एका मेळाव्याचे आयोजन केले होते. इंडियन मेडिकल असोसिएशनची कल्याण शाखा, कल्याण ईस्ट मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (केम्पा), नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा), कल्याण होमिओपॅथिक डिस्ट्रिक्ट असोसिएशन अशा विविध संघटनांचे सदस्य डॉक्टर्स याप्रसंगी उपस्थित होते. खासदार या नात्याने श्रीकांत शिंदे यांनी गेल्या पाच वर्षांत आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. विविध आरोग्य शिबिरे, दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी केंद्राच्या योजनेची मतदारसंघात अमलबजावणी, थॅलेसेमिया-हिमोफेलियासारख्या आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी आरक्षणाचा हक्क, प्रधानमंत्री सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना सुमारे अडिच कोटींची मदत अशा अनेक बाबींमध्ये श्रीकांत शिंदे यांनी खासदार आणि डॉक्टर या दोघांची कर्तव्ये पार पाडली आहे. डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी लोकसभेत खासगी विधेयक मांडून त्यांनी डॉक्टरांच्या प्रश्नालाही वाचा फोडली. या सर्व कारणांमुळे आणि उच्चशिक्षित तरुण उमेदवार लोकसभेत असला पाहिजे, यासाठी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला या मेळाव्यात पाठिंबा जाहीर करण्यात आला.