शिवसेना,भाजपसह सपाचे आमदार घेत आहेत नगरसेवकपदाचे मानधन

मुंबई नगरी टीम
मुंबई ।  नगरसेवक असलेले लोकप्रतिनीधी आमदार किंवा खासदारपदी निवडून आल्यावर एकाच सभागृहाचे मानधन घेणे नैतिकदृष्ट्या अपेक्षित असतानाही मुंबईतील तीन नगरसेवक  आमदार झाल्यावरही नगरसेवकाचे मानधन घेत असल्याची बाब समोर आली आहे.यामध्ये शिवसेना,भाजपसह समजावादी पार्टीच्या आमदारांचा समावेश असल्याचे पुढे आले आहे.

मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक असलेले लोकप्रतिनिधी आमदार व खासदार म्हणून निवडून आल्यावर दोन्ही पैकी एकाच सभागृहाचे मानधन घेणे नैतिकदृष्ट्या अपेक्षित आहे परंतु  शिवसेनेचे दिलीप लांडे, भाजपचे पराग शाह  आणि समाजवादी पार्टीचे रईस शेख हे नगरसेवक आमदारपदी निवडून  येवूनही महानगरपालिकेचे मानधन घेत असल्याची बाब माहिती अधिकारात स्पष्ट झाली आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याबाबत महानगरपालिकेच्या चिटणीस खात्याकडे जे नगरसेवक आमदार आणि खासदारपदी निवडून आले आहेत.त्यांची माहिती देताना नाव,वेतन व भत्ता अशी एकूण रक्कम घेत नसल्यास त्याची माहिती देण्यात यावी अशी माहिती मागितली होती.त्यानुसार चांदिवली मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे,घाटकोपरचे भाजपचे आमदार पराग शाह आणि भिवंडी ( पूर्व) चे समाजवादी पार्टीचे आमदार सईस शेख हे नगरसेवक असून ते सध्या महानगरपालिकेचेही मानधन घेत आहेत.सईस शेख हे मुंबईतील नागपाडाचे नगरसेवक आहेत.आमदार दिलीप लांडे हे कुर्ला येथील तर भाजपचे आमदार पराग शाह हे घाटकोपरचे नगरसेवक आहेत.हे तिन्ही आमदार सध्या महानगरपालिकेचे मानधन सुद्धा घेत असल्याची माहिती गलगली यांना महानगरपालिकेच्या चिटणीस खात्याने दिली आहे.आमदार रईस शेख,पराग शहा आणि दिलीप लांडे यांस दरमहा २५ हजार  मानधन तर  महापालिकेच्या प्रत्येक सभेकरिता १५० रूपयांचा भत्ता दिला जातो.

Previous articleअतिवृष्टीमुळे २९० रस्ते बंद,४६९ रस्त्यांवरची वाहतूक खंडित तर १४० पूल पाण्याखाली
Next articleआमदार फोडण्यासाठी भाजपचे पदाधिकारी पैसे घेवून गेले,पोलीसांना सुगावा लागताच काढला पळ !