एकनाथ शिंदेकडे नेमके आमदार किती ? अखेर खरी माहिती आली समोर

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.एकनाथ शिंदे सोबत सुरतहून आसामच्या गुवाहाटी मुक्कामी असणा-या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या संख्येबाबत अनेक दावे केले जात असताना एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणा-या आमदारांचा खरा आकडा समोर आला आहे.

शिवसेनेच्या विरोधात बंडाळी केल्यानंतर बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे आणि शिवसेनेत आता खऱ्या अर्थाने संसदीय लढाईचा प्रारंभ झाला आहे.शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदावरून उचलबांगडी केल्यानंतर शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी बंडखोर आमदारांना व्हीप जारी करत कारवाईचा इशारा दिला.तर दुसऱ्याबाजूला एकनाथ शिंदे यांनी मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांची उचलबांगडी करत त्यांच्या ठिकाणी भरत गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केल्यामुळे सेनेतील संघर्ष आता आणखी शिगेला पोहोचला आहे.विधानसभेचे उपाध्यक्षांना या बंडखोर आमदारांनी यासंदर्भात दिलेल्या पत्रात तसा उल्लेख करण्यात आला आहे.बंडखोर आमदारांच्यावतीने उपाध्यक्षांना जे पत्र देण्यात आले त्यासाठी शिवसेनेचे अधिकृत लेटरहेडचा वापर करण्यात आला आहे.यावर बंडखोर आमदारांच्या स्वाक्ष-या असल्याने एकनाथ शिंदे यांच्या सोबत नेमके किती आमदार आहेत हे स्पष्ट झाले आहे.

विधानसभेचे उपाध्यक्षांना पाठवलेल्या या पत्रावर शिवसेनेच्या एकूण ३४ बंडखोर आमदारांच्या स्वाक्ष-या असल्याचे स्पष्ट झाले आहे.या पत्रावर प्रदिप जैस्वाल,संजय रायमुलकर,महेंद्र दळवी,महेंद्र थोरवे,भरत गोगावले,संदिपान भुमरे,तानाजी सावंत,बालाजी कल्याणकर,अब्दुल सत्तार,प्रताप सरनाईक, ज्ञानराज चौगुले,संजय गायकवाड,महेश शिंदे,नरेंद्र भोंडेकर,एकनाथ शिंदे,राजेंद्र पाटील,शंभुराज देसाई,संजय शिरसाट,नितीन देशमुख,किशोर पाटील,प्रकाश सुर्वे,राजकुमार पटेल,लता सोनवणे, यामिनी जाधव,सुहास कांदे,विश्वनाथ भोईर, अनिल बाबर,चिमणराव पाटील,शहाजी पाटील,बालाजी किणीकर,शांताराम मोरे,श्रीनिवास वनगा,रमेश बोरणारे आणि बच्चू कडू अशा एकूण ३४ आमदारांच्या स्वाक्ष-या आहेत.हे पत्र काल देण्यात आल्यानंतर शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख,किशोर पाटील यांनी माघार घेवून मुंबई गाठली आहे.या यादीतील नरेंद्र भोंडेकर हे अपक्ष तर राजकुमार पटेल,बच्चू कडू हे प्रहार संघटनेचे आमदार असल्याने एकनाथ शिंदे यांच्याकडे ३१ आमदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.रादानगरीचे प्रकाश अबिटकर हे या बंडखोर आमदारांसोबत काल दिसले असले तरी त्यांचे या यादीत नाव नसून त्यांनी या पत्रावर सही केली नाही.

Previous articleशिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार
Next articleठाकरे सरकार अडचणीत ! एकनाथ शिंदेकडे शिवसेनेचे ३७ तर ९ अपक्ष आमदार