शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेनेने यापूर्वी अनेक आव्हाने पाहिली आहेत.मी पाठ दाखवणारा नाही,माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे ? मी त्यांना आपले मानतो ते मानतात हे माहिती नाही. तुम्ही पळता कशाला ? समोर येऊन बोला, त्यांच्या पैकी कुणीही सांगितले की मी मुख्यमंत्री नको तर मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे.आज मी वर्षावरचा मुक्काम हलवतो,असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना केले.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ३४ आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले असतानाच आज या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाज माध्यमाच्या माध्यमातून संवाद साधून बंडखोरी केलेल्या आमदारांना भावनिक साद घातली.सध्याची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नसल्याच्या बातम्या पसरविण्यात आल्या.मात्र २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकट्याच्या ताकदीवर ६३ आमदार निवडून आणले.गेल्या मंत्रिमंडळात आणि सध्याच्या सरकारमध्ये मंत्रीपदे मिळाली ती कोणामुळे मिळाली असा सवाल मुख्यमंत्र्यांनी बंडखोरी करणा-या आमदारांना केला.बंडखोरी केलेल्या आमदारांना सुरतला नंतर गुवाहाटीला नेण्यात आले. त्यावेळी आम्हाला परत यायचे असे आमदारांचे फोन आले असेही मुख्यमंत्री म्हणाले.मी मुख्यमंत्री नको हे या आमदारांनी समोर येवून सांगायला हवे होते.तिकडे असलेल्या एकाही आमदाराने असे सांगितले तरी मी लगेच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.मी खुर्चीला चिटकून राहणारा नाही.माझ्या समोर येवून बोला आजच वर्षा सोडून जातो.मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतो.तो राजीनामा घेवून राज्यपालांना द्या असे आवाहनही त्यांनी बंडखोर आमदारांना केले.या सर्व प्रकारामुळे कोणाचे नुकसान होत आहे हे बघा असेही ते म्हणाले.ही माझी मजबूरी नाही, अशी अनेक आव्हाने पाहिली आहेत.मी पाठ दाखवणारा नाही.त्यामुळे मी लायक नाही असे ज्या सैनिकांना वाटत असे त्यांनी तसे सांगावे,मी शिवसेना पक्षप्रमुखपद आणि मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे असे सांगून,मुख्यमंत्री हा शिवसेनेचा होणार असेल तर मला आनंद आहे असेही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.पदे येतात आणि जातात.हे माझे नाटक नाही.आमदारांच्या संख्या कोणाकडे जास्त आहे याला महत्व नाही असे सांगून मला मुख्यमंत्री राहण्याची अजिबात इच्छा नाही असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.

माझी कोरोनाची चाचणी सकारात्मक आली असल्याचे सांगतानाच,कोरोनाच्या काळात लढाई लढलो.कसलाही अनुभव नसताना कठिण काळात संघर्ष करीत तोंड दिले.जे करायचे होते ते प्रमाणिकपणे केले. या कामामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची गणना पहिल्या पाच मुख्यमंत्र्यामध्ये झाली असेही मुख्यमंत्री म्हणाले.कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री भेटत नव्हते अशी चर्चा होती.पण ही गोष्ट सत्य आहे असेही ते म्हणाले.त्यानंतर माझ्या मानेवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने मी भेटू शकले नाही मात्र त्यांनतर भेटायला सुरूवात केली असेही त्यांनी स्पष्ट केले.शिवसेना आणि हिंदुत्व एकत्र जोडले गेले शब्द असून,शिवसेना आणि हिंदुत्व वेगळे होवू शकत नाही असे सांगून,विधानमंडळात हिंदुत्वावर बोलणारा पहिला मुख्यमंत्री होतो असेही त्यांनी ठणकावून सांगितले.नुकतीच विधानपरिषदेची निवडणूक झाली.आमदार ज्या हॅाटेल मध्ये होते तेथे गेलो तेव्हा बोललो ही कुठली लोकशाही.शंका ठिक पण लघु शंकेला गेला तरी शंका.ही कुठकी लोकशाही ? असा सवालही त्यांनी केला.कसला अनुभव नसतानाही जिद्दीने काम केले जबाबदारी जिद्दीने पार पाडण्यासाठी पुढे आलो.यापूर्वी कॅांग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात लढलो.पण त्यानंतर नाईलाजाने वेगळा मार्ग घ्यावा लागला.त्यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल असे सांगितले.

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या घटनेनंतर शरद पवार आणि कमलनाथ यांनी फोन करून विश्वास व्यक्त केला.मात्र माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नके असेल तर मी बाजूला होण्यास तयार असल्याचे ते म्हणाले.ज्याने घाव घातला जात आहे त्याच्या वेदना अधिक आहे. शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करु नका अशी कुऱ्हाडीची गोष्ट ही त्यांनी यावेळी सांगितली.

Previous articleकाँग्रेसला धक्का : भाजपचे प्रसाद लाड विजयी,काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव
Next articleएकनाथ शिंदेकडे नेमके आमदार किती ? अखेर खरी माहिती आली समोर