काँग्रेसला धक्का : भाजपचे प्रसाद लाड विजयी,काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव

मुंबई नगरी टीम

मुंबई । अत्यंत चुरशीच्या झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राज्यसभा निवडणुकीप्रमाणे चमत्कार घडेल,असा दावा भाजपकडून करण्यात आला होता.भाजपचा हा दावा अखेर खरा ठरला असून,काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे हे पराभूत झाले असून,भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड हे विजयी झाले.भाजपला पाच तर महाविकास आघाडीला पाच जागा मिळाल्या आहेत.शिवसेनेचे सचिन अहिर,आमशा पाडवी,राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर,एकनाथ खडसे,भाजपचे प्रविण दरेकर,राम शिंदे,उमा खापरे,श्रीकांत भारतीय यांचा पहिल्या फेरीत विजय झाला तर काँग्रेसचे दुसरे उमेदवार भाई जगताप यांना विजयासाठी दुस-या फेरीची वाट पहावी लागली.या निवडणुकीत काँग्रेसची ३ मते फुटल्याची चर्चा आहे.

विधान परिषदेच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पाच जागांवर तर भाजपा पाच जागांवर विजय झाला आहे.या निवडणुकीत राज्यसभेप्रमाणे भाजपने महाविकास आघाडीला धक्का दिला आहे.भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांचा या निवडणुकीत विजय झाला आहे.काँग्रेसचे दुस-या पसंतीचे उमेदवार भाई जगताप दुस-या फेरीत विजयी झाले तर काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पराभव पत्करावा लागला आहे.त्यांना २२ मते मिळाली.प्रसाद लाड यांना २८ मते मिळाली.तर भाई जगताप यांना २६ मते मिळाली.शिवसेनेचे सचिन अहिर,आमशा पाडवी,राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर,एकनाथ खडसे तर भाजपचे उमेदवार भाजपचे प्रविण दरेकर,राम शिंदे,उमा खापरे,श्रीकांत भारतीय हे पहिल्याच फेरीत विजयी झाले.काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांना विजयी होण्यासाठी दुस-या फेरीची वाट पहावी लागली.राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांना २९ मते मिळाली.राम शिंदे आणि श्रीकांत भारतीय यांना ३० मते मिळाली.
रा

ज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का दिल्यावर विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने प्रसाद लाड यांना पाचवा उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्याने काँग्रेस भाई जगताप आणि प्रसाद लाड यांच्यात दहाव्या जागेसाठी अत्यंत चुरशीची लढाई झाली.त्यात काँग्रेसचे भाई जगताप यांना २६ मते मिळाली. भाजपचे प्रसाद लाड यांना २८ मते मिळाली. मात्र काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.काँग्रेसने भाजपचे आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतावर काँग्रेसने आक्षेप घेतल्याने मतमोजणीस दोन तासांचा विलंब झाला.विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांच्यात चुरशीची लढत होईल अशी शक्यता होती.यामध्ये भाजपने बाजी मारली असून,भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांनी या निवडणुकीत बाजी मारीत महाविकास आघाडीला दे धक्का देत विजय प्राप्त केला आहे.काँग्रेसने भाजपचे आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतावर आक्षेप घेतल्याने मतमोजणीस दोन तासांचा विलंब झाला.त्यानंतर मतमोजणीला सुरूवात झाल्यावर भाजपचे प्रविण दरेकर,राम शिंदे,उमा खापरे,श्रीकांत भारतीय तर शिवसेनेचे सचिन अहिर,आमशा पाडवी,राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर,एकनाथ खडसे आणि हे पहिल्याच फेरीत विजयी झाले.

विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी पहिल्या पसंतीच्या २६ मतांची गरज होती. मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपच्या उमेदवार उमा खापरे यांच्या कोट्यातील पहिल्या पसंतीच्या मताला आक्षेप घेतल्यानंतर ही दोन्ही मते बाद झाल्याने २८३ मतांची मोजणी करण्यात आली.त्यामुळे पहिल्या पसंतीचा मतांचा कोटा २५.७१ वर आला.या निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धत असल्याने मतांची फाटाफूट होण्याची शक्यता होती.संख्याबळानुसार भाजपचे चार,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन तर काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येण्याची परिस्थिती होती.भाजपचा पाचवा तर काँग्रेसच्या दुस-या उमेदवाराला मतांची आवश्यकता होती.छोटे पक्ष आणि अपक्षांची एकूण २९ मतांना महत्व प्राप्त झाले होते.भाजपला पाच जागा जिंकण्यासाठी एकूण १३० मतांची गरज होती.भाजपचा पाचवा उमेदवार विजयी होण्यासाठी १२ तर काँग्रेसला १० मतांची आवश्यकता होती.राज्यसभा निवडणुकीच्या सत्तासंघर्षानंतर विधान परिषदेची निवडणूक चुरशीची झाली.विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी दुपारी ४ वाजेपर्यंत २८५ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतपेट्या बंद करण्याआधी काँग्रेसने भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतांवर आक्षेप घेतला.

आक्षेपामुळे मतमोजणीस विलंब

गुप्त पद्धतीने मतदान असताना मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांनी आपले मत हे दुसऱ्या व्यक्तीला मतपेटीमध्ये टाकण्यास दिले.त्यावर काँग्रेसने आक्षेप घेत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली.मात्र ही तक्रार फेटाळली.त्यामुळे काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार केल्याने मतमोजणीस सुमारे दोन तासांचा विलंब लागला.विलंबामुळे मतमोजणीस सुरूवात झाल्यावर मतांची छाननी करण्यात येत असताना राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कोट्यातील पहिल्या पसंतीच्या मताला भाजपने तर भाजपच्या उमेदवार उमा खापरे यांच्या कोट्यातील पहिल्या पसंतीच्या मताला महाविकास आघाडीने आक्षेप घेतल्याने ही दोन्ही मते बाद ठरविण्यात आली.या प्रक्रियेमुळे मतमोजणीस विलंब लागला.या दोन्ही मतांविरोधात भाजप आणि महाविकास आघाडीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितली.

भाजपचे दोन आमदार मतदानासाठी रूग्ण वाहिकेने विधानभवनात

पिंपरीचे भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक या गंभीर आजाराने त्रस्त असून, मतदानासाठी हे दोन्ही आमदार रूग्ण वाहिकेने मतदानासाठी विधानभवनात आले होते.आजारी असतानाही राज्यसभेप्रमाणे त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीतही मतदान केले.राज्यसभेच्या निवडणूकीवेली सुद्धा भाजपचे हे दोन आमदार रूग्ण वाहिकेतून मतदानासाठी आले होते.

नवाब मलिक आणि अनिल देशमुख मतदानास मुकले

राज्यसभा निवडणुकीत मतदानास मुकलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारल्याने महाविकास आघाडीला पुन्हा एकदा धक्का बसला.अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली . मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अशी परवानगी देण्यास नकार दिल्याने या दोघांना राज्यसभेप्रमाणे विधानपरिषद निवडणुकीत मतदान करता आले नाही.

अपघात होवूनही मंत्री मतदानासाठी विधानभवनात

चुरशीच्या झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रत्येक मताला महत्व प्राप्त झाले होते.राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे मतदानासाठी मुंबईला येत असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात शंकरराव गडाख यांच्या मणक्याला दुखापत झाल्याने.गडाख यांच्या पाठीत तीव्र वेदना जाणवत होत्या.अशा परिस्थितीत मतदानासाठी शंकरराव गडाख विधानभवनात पोहचले.यावेळी ते आपल्या सहकाऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवून आधार घेऊन चालत होते. त्यांना एक-एक पाऊल टाकतनाही वेदना जाणवत होत्या. त्यामुळे गडाख हळुहळू चालत मतदान केंद्रापर्यंत पोहोचले.मतदान केल्यानंतर गडाख यांनी उपचारासाठी थेट रिलायन्स रुग्णालय गाठले.

विजयी झालेले उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते
शिवसेना- सचिन अहिर ( २६ ) आमशा पाडवी ( २६ )
भाजप- प्रविण दरेकर ( २९ ) राम शिंदे ( ३० ) उमा खापरे ( २७ ) श्रीकांत भारतीय ( ३० ) प्रसाद लाड ( २८ )
राष्ट्रवादी काँग्रेस- रामराजे नाईक निंबाळकर ( २८ ) एकनाथ खडसे ( २९ )
काँग्रेस- भाई जगताप ( २६ )

Previous articleविधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात महाचमत्कार होणार
Next articleशिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार