आमदार फोडण्यासाठी भाजपचे पदाधिकारी पैसे घेवून गेले,पोलीसांना सुगावा लागताच काढला पळ !

मुंबई नगरी टीम
 मुंबई । झारखंड मधील हेमंत सोरेन यांचे सरकार पाडण्यासाठी पैसे देऊन आमदार फोडण्याचे कटकारस्थान भाजपकडून झारखंडमध्ये रचले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.भाजपचे महाराष्ट्रातील भाजपचे तीन पदाधिकारी झारखंडला गेले होते मात्र पोलिसांची कुणकुण लागल्यानंतर या तिघांनी तिथून पळ काढला असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

झारखंड मधील हेमंत सोरेन यांचे सरकार पाडण्यासाठी कट रचला गेल्याचे सांगून,अभिषेक दुबे या पत्रकाराला झारखंडमध्ये अटक केल्यानंतर त्याच्या पोलीस चौकशीतून हा धक्कादायक खुलासा समोर आल्याचे  मलिक यांनी स्पष्ट केले. दुबे नावाचा पत्रकार तीन आमदारांशी संपर्कात होता.या आमदारांशी डील करण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपचे एक माजी मंत्री देखील झारखंडला गेले होते असा गौप्यस्फोट मलिक यांनी केला. तसेच २१ जुलै रोजी भाजपचे महाराष्ट्रातील पदाधिकारी मोहीत कंबोज,अमित यादव,आशुतोष ठक्कर तिघे पैसे घेऊन झारखंड येथे दाखल झाले.मात्र पोलिसांची कुणकुण लागल्यानंतर या लोकांनी तिथून पळ काढला असेही मलिक म्हणाले.

आमदार फोडाफोडीच्या या घटनेची चौकशी करण्यासाठी झारखंड सरकारने एसआयटीची तीन पथके स्थापन केली असून यापैकी एक पथक झारखंडमध्ये,तर दुसरे दिल्लीत आणि तिसरे पथक महाराष्ट्रात तपासासाठी येणार आहे.महाराष्ट्रातील दोन आमदारांचा देखील त्यात समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.झारखंडची एसआयटी टीम महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना पुर्ण सहकार्य केले जाईल असेही मलिक म्हणाले.राज्यात पूरपरिस्थितीमुळे लोक दुःखात असताना भाजपचे नेते झारखंडचे आमदार फोडण्यासाठी पैसे घेऊन जात आहेत.एका-एका आमदारासाठी कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखविण्यात आले. पूरपरिस्थितीत हेच पैसे लोकांच्या मदतीसाठी देता आले असते,मात्र झारखंडचे सरकार पाडण्यासाठी भाजपची यंत्रणा काम करत आहे असा आरोपही मलिक यांनी केला. कर्नाटक सरकार पाडत असताना मुंबई कनेक्शन दिसून आले होते.आता झारखंड सरकार पाडतानाही महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे.लोकशाहीला डावलून सरकार स्थापन करण्याचे भाजपचे कारस्थान आता समोर आले असून झारखंड पोलीस नक्कीच याचा तपास करतील अशी शक्यता  मलिक यांनी व्यक्त केली.माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव पत्रकार अभिषेक दुबे यांनी पोलीस चौकशीत उघड केले आहे. यामुळे पैशांचा घोडेबाजार करुन झारखंड सरकार बदलण्याचा डाव उघड झाला आहे. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस शक्य होणार नाही.भाजपला ते शक्य नाही असेही मलिक यांनी भाजपला ठणकावून सांगितले.

Previous articleशिवसेना,भाजपसह सपाचे आमदार घेत आहेत नगरसेवकपदाचे मानधन
Next articleपूरग्रस्त १६ हजार कुटुंबांना राष्ट्रवादीचा मदतीचा हात ; अडीच कोटीचे साहित्य वाटप करणार