पूरग्रस्त १६ हजार कुटुंबांना राष्ट्रवादीचा मदतीचा हात ; अडीच कोटीचे साहित्य वाटप करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । महापूरामुळे बेघर झालेल्या १६ हजार पिडितांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून सुमारे २० हजार घरगुती भांडी आणि पांघरूण किटस असे अडीच कोटीचे साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली.

त्यापूर्वी मुंबई युवकचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी दिलेल्या बाधित क्षेत्रातील लोकांना औषधोपचार करण्यासाठी जाणाऱ्या पाच रुग्णवाहिकांना हिरवा कंदील पवार यांनी दाखवला.सहा जिल्ह्यातील चार जिल्हयात सर्वाधिक नुकसान झाले आहे. याबाबत राज्यसरकार धोरण जाहीर करेल असेही त्यांनी सांगितले.या महापूरामुळे १६ हजार घरे म्हणजेच १६ हजार कुटुंबांना मदत द्यायची गरज आहे. यामध्ये रत्नागिरी – चिपळूण – खेड यामध्ये ५ हजार, रायगड जिल्ह्यात ५ हजार, कोल्हापूर २ हजार, सांगली २ हजार, सिंधुदुर्ग – ५००, सातारा – १ हजार आदींचा समावेश आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून १६ हजार लोकांना २० हजार घरगुती भांडी, याशिवाय ज्या घरांचे नुकसान झाले त्यातील लोकांना २० हजार अंथरुण – पांघरूण कीट (सोलापूरी चादरी) शिवाय एक लाख कोरोना प्रतिबंधक मास्क, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांच्यावतीने डॉक्टरांची २५० पथके तपासणी व औषधे घेऊन दाखल झाली आहेत. याशिवाय गंभीर रुग्णांना औषधे व रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. २० हजार बिस्किटे व टोस्ट ब्रिटानिया कंपनीकडून घेऊन वाटप करण्यात येणार आहे.

राज्यात एखादी आपत्ती आल्यानंतर त्या भागात मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,पालकमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांचे दौरे लोकांना धीर देण्यासाठी उपयुक्त ठरत असतात.ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी दौरे करुन लोकांना दिलासा देण्यासाठी लक्ष घालणे योग्य ठरते. आता स्थानिक प्रशासन,तेथील संघटना आणि कार्यकर्ते पुनर्वसनाच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे इतर लोकांनी पूरग्रस्त भागात दौरे करुन ग्राऊंडवर काम करणाऱ्यांचे लक्ष विचलित होईल असे काम करु नये असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.यावेळी शरद पवार यांनी लातूर भूंकप पुनवर्सन कार्याची आठवण करुन दिली. लातूर भूंकपाच्यावेळी पंतप्रधान नरसिंह राव यांना लातूरचा दौरा करायचा होता. मात्र मी त्यांना दहा दिवस न येण्याची विनंती केली. तुम्ही आलात तर सर्व यंत्रणा तुमच्यासाठी कामाला लागेल, असे सांगितले. माझे ऐकून नरसिंह राव हे दहा दिवसांनी दौऱ्यावर आले होते, अशी आठवण सांगितली. राज्यावर अशाप्रकारचे संकट आल्यानंतर मी दौऱ्यावर जात असतो. मात्र यावेळी मी देखील दौऱ्यावर जाणे मुद्दाम टाळले आहे.राज्यपाल यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला आहे.पूरग्रस्तांना उभे करण्यासाठी केंद्राकडून अधिक मदत मिळवण्यासाठी ते प्रयत्न करतील असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.मात्र इतर लोकांनी तिथे दौरे करणे टाळावेत असेही पवार यांनी सांगितले.

Previous articleआमदार फोडण्यासाठी भाजपचे पदाधिकारी पैसे घेवून गेले,पोलीसांना सुगावा लागताच काढला पळ !
Next articleराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनला भाजपचे कार्यालय बनवलंय