महेंद्रसिंग धोनीला कर्णधार बनवण्याच्या निर्णयामध्ये माझा सहभाग

मुंबई नगरी टीम

रांची। तुम्ही राष्ट्रवादीचा एक आमदार निवडून दिला आणि आम्ही परिवर्तनाला सुरूवात केली.जर येथून आमचे अजून आमदार निवडून आले तर आम्ही झारखंडमधील अनेक समस्या सोडवू आणि ज्या प्रकारे आम्ही महाराष्ट्राची प्रगती केली आहे त्याच पद्धतीने झारखंडचा सुद्धा विकास करू असा,विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथील जनतेला देत,महेंद्रसिंग धोनीला कर्णधार बनवण्याच्या निर्णयामध्ये माझा सहभाग होता असे स्पष्ट केले.

झारखंडमधील रांचीच्या हरमू मैदानात झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यस्तरावरील कार्यकर्ता मेळाव्यात आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गदर्शन करताना तेथील जनतेला आश्वासन दिले. पक्षाच्या राज्यस्तरीय परिषदेत उपस्थित राहून मला आज आनंद होत आहे.हुसैनाबादचे आमदार कमलेशकुमार सिंग यांनी स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची उभारणी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत असे सांगून,हा मेळावा यशस्वी करणा-या २४ जिल्ह्यांतील उपस्थित राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो,असेही पवार म्हणाले.बीसीसीआयचा माजी अध्यक्ष म्हणून माझा क्रिकेट खेळाशी दीर्घ संबंध आहे.आणि महेंद्रसिंग धोनीला कर्णधार बनवण्याच्या निर्णयामध्ये माझा सहभाग होता.आणि मला खात्री होती की तो भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक होईल.त्याचा विक्रम अनुकरणीय आहे.धोनीने देशासाठी अनेक विश्वचषक स्पर्धांमध्ये योगदान दिले आहे.असेही पवार यांनी सांगितले.

झारखंड हे भगवान बिरसा मुंडा यांना मानणारे राज्य आहे.झारखंडच्या भूमीतील प्रत्येक व्यक्ती जे हातात कार्य घेते ते यशस्वी करतो.प्रफुल्ल पटेल हे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे चेअरमन असल्याने झारखंडमधील आठ तरुणांना विश्वचषक फुटबॉल स्पर्धा खेळण्याची संधी उपलब्ध झाली.या ठिकाणी बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. झारखंडमध्ये बरेच काही करण्याचा आमचा मानस आहे.आपण आमचा एक आमदार निवडून दिलात आणि आम्ही परिवर्तन सुरू केले. जर तुम्ही अजून आमचे आमदार निवडून दिले तर आम्ही झारखंडमधील ब-याच समस्या सोडवू आणि महाराष्ट्राची ज्या पध्दतीने प्रगती केली आहे त्याच पद्धतीने झारखंडचा विकास करू असा विश्वासही पवार यांनी येथील जनतेला दिला.

Previous articleचिंता वाढली : राज्यात आज ११ हजार १४१ नवे कोरोनाचे रूग्ण; ३८ रुग्णांचा मृत्यू
Next articleघरखरेदीची नोंदणी कुटुंबातील महिलेच्या नावावर केल्यास मुद्रांक शुल्कात मिळणार सवलत