“राहुल, धारावीच्या अनेक पिढ्या तुला आशीर्वाद देतील”

“राहुल, धारावीच्या अनेक पिढ्या तुला आशीर्वाद देतील”

मुंबई नगरी टीम

मुंबई : ” खासदारकीच्या पहिल्याच टर्म मध्ये राहुल शेवाळे यांनी जे काम केलं, ते येरागाबाळ्याचं काम नाही. आणि या कामासाठी राहुल, तुला धारावीच्या अनेक पिढ्या आशीर्वाद देतील” अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धारावी इथल्या सभेत महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांची पाठ थोपटली.

दक्षिण- मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी धारावीच्या ९० फिट रोड वर घेण्यात आलेल्या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. या सभेला उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत श्रीमती रश्मी ठाकरे, शिवसेना ज्येष्ठ नेते लीलाधर डाके, आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, शिवसेना विभागप्रमुख मंगेश सातमकर, आमदार तमिळ सेलवन, तुकाराम काते, प्रकाश फातर्फेकर, सदा सरवणकर, आरपीआयचे नेते अविनाश महातेकर, जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अनिल ठाकूर, राजेश शिरवाडकर, महिला सचिव दिव्या ढोले, सौ. कामिनी राहुल शेवाळे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

धारावीच्या सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल शेवाळे यांच्या पाच वर्षांतील कामाची स्तुती केली. “राहुलचा जन्म धारावीत झाल्याने त्याला धारावीच्या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळेच खासदारकीच्या पहिल्याच टर्म मध्ये  धारावीच्या विकासाआड येणारे फनेल झोन आणि इतर समस्या राहुलने सोडवल्या. एसपीव्ही, स्मार्ट सिटी अश्या अनेक माध्यमातून धारावीचा पुनर्विकास करण्याचा राहुलने प्रयत्न केला. राहुल शेवळेंच्या या कामगिरीमुळे धारावीचा पुनर्विकास लवकरच होईल आणि मी इथे त्या उद्घाटनासाठी येईन, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.

” ३७० कलम रद्द न करणारे आणि देशद्रोही ठरविणारे कलम रद्द करायला निघालेली देशविरोधी काँग्रेस- राष्ट्रवादी  तुम्हाला पुन्हा सत्तेत आलेली चालेल का?? आता तुम्हाला विचार करण्याची गरज आहे. अशा शब्दांत उद्धवजी यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी ला मत देणाऱ्या मतदारांना पुन्हा एकदा विचार करण्याचे आवाहन केले.महायुतीचे उमेदवार शेवाळे यांनी या सभेत, धारावी पुनर्विकासासाठी केलेल्या कामांची माहीत देत काँग्रेसच्या उमेदवारांवर सडकून टीका केली. ” मी तेरा वर्षांचा असताना गायकवाड आमदार झाले. ३०- ४० वर्ष गायकवाड कुटुंबियांनी स्वतः चा विकास केला, मात्र धारावीचा विकास केला. ‘क्या हुआ तेरा वादा??’ हा प्रश्न विचारायला गायकवाड यांना लाज वाटायला हवी. शिवसेना वादा नाही, तर वचन देते आणि ते वचन शिवसेना पाळते. येत्या २९ तारखेला जनताच गायकवाड यांना त्यांच्या वाद्याची आठवण करून देईल.” अशा शब्दांत शेवाळे यांनी गायकवाड यांना आव्हान दिले.

“राहुलजी तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. आजच्या सभेची गर्दी बघून तुमचा विजय निश्चित आहे”, अशा शब्दांत आरपीआय चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले राहुल शेवाळे यांना शुभेच्छा दिल्या. तर “एकनाथ गायकवाड यांनी ही लढाई हरावी, कारण राहूलच जिंकणार आहे धारावी,”जाग रही है गाव – गाव की नार, और जित जायेगे चौकीदार” अशा चारोळ्या करत आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली.काही जण नुसतंच सांगतात, यांना मतं देऊ नका. मग कोणाला मत द्यायचं ते तरी सांगा. आणि काँग्रेस- राष्ट्रवादी गुणाचे पुतळे आहेत का??आम्ही का नको, हे तरी सांगा. अशा शब्दांत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेचे नाव न घेता टीका केली.

 

 

 

 

Previous articleउत्तर भारतीयांच्या सुख दु:खात सामिल होणा-या किर्तीकरांना विजयी करा
Next articleधर्मांध शक्तींचा पराभव करण्यासाठी सर्वसामान्य मतदार काँग्रेसच्याच पाठिशी