वाहतूककोंडीमुक्त मतदारसंघासाठी होलिस्टिक सोल्यूशन
मुंबई नगरी टीम
डॉ. श्रीकांत शिंदे यांची वचननाम्यात ग्वाही
रेल्वे, मेट्रो, रस्ते, जलवाहतुकीचे प्रकल्प पूर्ण करण्यावर भर
आरोग्यव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी पावले
खिडकाळी येथे ११३ हेक्टरवर एज्युकेशन हब
गुणवान क्रीडापटूंसाठी शिष्यवृत्ती
ठाणे : रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि जलवाहतूक अशा वाहतुकीच्या सर्व पर्यायांच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांत कल्याण लोकसभा मतदारसंघ वाहतूककोंडीमुक्त करण्यासाठी होलिस्टिक सोल्यूशनचा अवलंब करण्यात येणार असल्याची ग्वाही कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वचननाम्यात देण्यात आली आहे. त्याचबरोबर आरोग्य सेवेचे सक्षमीकरण, खिडकाळी येथे एज्युकेशन हब, एमएमआरडीएच्या माध्यमातून सेवा क्षेत्रात हजारो रोजगार, उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच क्रीडा शिष्यवृत्ती अशा अनेक मुद्द्यांचा वचननाम्यात समावेश आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कल्याण येथे झालेल्या सभेत या वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले. वचननामा म्हणजे केवळ आश्वासनांची खैरात नसून प्रत्यक्षात करण्यात येणाऱ्या कामांच्या माध्यमातून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्याचे व्हिजन डॉक्युमेंट आहे, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.
वाहतूक, शिक्षण, रोजगार, उद्योग, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, नगरनियोजन, पाणीपुरवठा व स्वच्छता, क्रीडा, संस्कृती अशा विविध मुद्द्यांचा विचार वचननाम्यात करण्यात आला आहे. रेल्वे आणि रस्त्यांचे प्रकल्प पूर्ण करण्याबरोबरच मेट्रो आणि जलवाहतुकीचे प्रकल्प येत्या काळात पूर्ण करून वाहतुकीचे विविध पर्याय लोकांना उपलब्ध करून देणार असल्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूककोंडीचा प्रश्न निकाली निघेल. त्याचबरोबर, अस्तित्वातील रुग्णालयांचे अद्ययावतीकरण, नवीन रुग्णालये आणि अन्य अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांच्या माध्यमातून आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे.
दिवा जवळील खिडकाळी येथे ११३ हेक्टर जमिनीवर एज्युकेशन हब विकसित केले जाणार आहे. येथे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी), आयआयटी, आयआयएम यांच्या दर्जाच्या समकक्ष शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण आणि कँपस रिक्रूटमेंटच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच, एमएमआरडीएच्या माध्यमातून सेवा क्षेत्राचा विकास करून त्यायोगेही हजारो रोजगार कल्याण लोकसभा मतदारसंघात उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
प्रदूषण निर्मूलन आणि पर्यावरण जतनावर विशेष भर दिला जाणार असून वालधुनी प्राधिकरणाचे पुनरुज्जीवन करून वालधुनी व उल्हास नदीचे शुद्धीकरण करण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत. तसेच, डोंबिवली व अंबरनाथ येथील एमआयडीसीमधील कारखान्यांमधील दूषित सांडपाण्यावर ईटीपी प्लांटच्या माध्यमातून प्रक्रिया होईल, यासाठी यंत्रणा उभी केली जाणार आहे.