विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा हक्क सरकारला कोणी दिला ?

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा हक्क सरकारला कोणी दिला ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन छेडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांनी आज सकाळी या विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतून बाद केलेल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे. या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा हक्क फडणवीस सरकारला कोणी दिला ? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. या मुलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार. यासाठी आजच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांची भेट घेणार असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले आहे.

पवार म्हणाले की राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचे सरकार असूनही असे होणे, हे सरकारचे अपयश आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच या विद्यार्थ्यांना फटका बसलाय. मग हे फडणवीस सरकार की, फसणवीस सरकार हा या विद्यार्थ्यांचा प्रश्न चुकीचा ठरतो का ? मराठा समाजातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आझाद मैदानावर आंदोलन छेडले आहे या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे. जर मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा देखील इशारा वैद्यकीय विद्यार्थ्यांकडून देण्यात आला आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षात दंत वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. याच मुद्द्यावरून मराठा समाजातील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे.

Previous articleसरकारकडे निधी आहे तर मग तो खर्च का करत नाही
Next articleमराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याला जॉन बेली उपस्थित राहणार