शरद पवार यांचे दुष्काळी परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई नगरी टीम
मुंबई : सातारा, सोलापूर, बीड, अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. मी या जिल्हयांचा दौरा केल्यानंतर विस्ताराने मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून आपण लक्ष घालावे व संपुर्ण दुष्काळी भागासाठी सर्वकष निर्णय घ्यावेत अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
दरम्यान राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्याची वेळही शरद पवार यांनी पत्राद्वारे मागितली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेचा रणसंग्राम संपताच सोलापूर, सातारा, बीड, उस्मानाबाद, अहमदनगर या दुष्काळी जिल्ह्यांचा दौरा करत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधावर थेट जात आणि चारा छावण्यातील शेतकऱ्यांच्या, मालकांच्या अडचणी शिवाय धनगर समाजातील प्रतिनिधींनी शेळ्या मेंढ्याकरीता चारा छावणीच्या धर्तीवर स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी केली. त्यांच्या दृष्टीने तो दिलासा ठरेल असेही शरद पवार यांनी पत्रात म्हटले आहे.
शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या जाणून घेतलेल्या समस्या, त्यांच्या अडचणी यावर उपाययोजना काय करायला हव्यात यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात प्रत्येक मुद्दे आणि समस्या व दुष्काळावर काय उपाययोजना कराव्यात याबाबतचे सविस्तर म्हणणे मांडले आहेत.या समस्यांवर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी दुष्काळी भागातील काही प्रतिनिधींसह मुख्यमंत्र्याची वेळही मागितली आहे.