१४६ ग्रामपंचायतींसाठी २३ जून रोजी मतदान
मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील विविध २० जिल्ह्यांमधील १४६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच ६३ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील ६ हजार ७१९ सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २३ जून २०१९ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
सहारिया यांनी सांगितले की, जुलै २०१९ ते सप्टेंबर २१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. सार्वत्रिकसह सर्व निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे ३१ मे २०१९ ते ६ जून २०१९ या कालावधीत स्वीकारले जातील. २ व ५ जून २०१९ या दोन सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाही. नामनिर्देशनपत्रांची छाननी ७ जून २०१९ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे १० जून २०१९ पर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान २३ जून २०१९ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सकाळी ७.३० पासून दुपारी केवळ ३ पर्यंतच मतदानाची वेळ असेल. सर्व ठिकाणी मतमोजणी २४ जून २०१९ रोजी होईल.
सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: पालघर- ७, रायगड- ८, रत्नागिरी- १, नाशिक- ७४, धुळे- १, जळगाव- १, अहमदनगर- १०, पुणे- ३, सातारा- ३, सांगली- १, कोल्हापूर- १, उस्मानाबाद- १, लातूर- २, नांदेड- १, अकोला- १, यवतमाळ- ३, वाशीम- १, बुलडाणा- १, वर्धा- ४ आणि चंद्रपूर- २२ एकूण- १४६.
पोटनिवडणूक होणाऱ्या सरपंचपदांच्या जिल्हानिहाय रिक्त जागा: ठाणे- १, पालघर- २, रायगड- १०, रत्नागिरी- ५, सिंधुदुर्ग- १, नाशिक- ३, अहमदनगर- १, नंदुरबार- २, पुणे- ३, सोलापूर- १, सातारा- ६, औरंगाबाद- ४, नांदेड- ८, उस्मानाबाद- २, परभणी- १, वाशीम- ५, बुलडाणा- १, चंद्रपूर- १ आणि भंडारा- ५. एकूण- ६२.