रामदास आठवले मंत्रिपदाची शपथ घेणार
मुंबई नगरी टीम
मुंबई : नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांना स्थान मिळणार असून,आज होणा-या शपथविधी सोहळ्यात त्यांना मंत्रीपदाची शपथ दिली दिली जाणार आहे. तसे अधिकृत निमंत्रण रामदास आठवले यांना प्राप्त झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधीच्या मंत्रिमंडळातील २१ मंत्र्यांना नारळ देण्यात येणार असल्याची चर्चा असल्याने आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा आजच्या मंत्रिमंडळात समावेश होईल किंवा नाही याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते.आज सकाळपासून रामदास आठवले हे मंत्रिपदासाठी शहांच्या फोनची वाट पाहत होते. अखेर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना पंतप्रधान कार्यालयातून दूरध्वनी आला असून ४.३० वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भेटण्याचे निमंत्रण दिले असून, सायंकाळी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याचे अधिकृत निमंत्रण आठवले यांना देण्यात आले आहे.
आठवलेंना मंत्रीपद मिळणार या बातमीने कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आठवले यांनी राज्यभर फिरून मोदींना जिंकून देण्याचे आवाहन केले होते. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आठवले यांना संधी देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.