कार्यकर्त्यांचे प्रेम आणि जनतेचा आशीर्वाद हा मंत्री पदापेक्षा मोठा

कार्यकर्त्यांचे प्रेम आणि जनतेचा आशीर्वाद हा मंत्री पदापेक्षा मोठा

मुंबई नगरी टीम

मुंबई  : कार्यकर्त्यांचे प्रेम आणि जनतेने दिलेला आशीर्वाद हा मंत्री पदापेक्षा मोठा असल्याचे प्रतिपादन खासदार गोपाळ शेट्टी यांनी केले. राज्यामध्ये प्रथम क्रमांकाचे मताधिक्य मिळविल्याबद्दल, भाजपा मागाठाणे विधानसभा क्षेत्राच्यावतीने खासदार गोपाळ शेट्टी यांचा भव्य नागरी सत्कार, भाजपा सचिव आमदार प्रवीण दरेकर व विधानसभा क्षेत्र अध्यक्ष मोतीभाई देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. संत ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

या सत्काराला उत्तर देताना, खासदार गोपाळ शेट्टी यांनी, मतदारांचे व कार्यकर्त्यांचे जाहीर आभार मानले. मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील व केंद्रांशी संबंधित विषय आपण सर्वांच्या सहकार्याने मार्गी लावू, असे सांगितले. मोदींवर विश्वास व्यक्त करत त्यांनी जनतेने जो जनाधार दिला आहे तो टिकविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची असल्याचे सांगितले. तसेच जनतेच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सतत काम करीत रहा, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.  मागाठाणे विधानसभा क्षेत्रात प्रत्येक वर्षी भाजपाचा जनाधार वाढत असल्याचे सांगून, जास्तीत जास्त कार्यक्रम व उपक्रम राबवित त्यांना उपस्थित राहण्याची संधी  दिल्याबद्दल गोपाळ शेट्टी यांनी आ. प्रवीण दरेकर यांचा गौरव केला.

यावेळी भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या सर्वस्पर्शी कामाचा गौरव केला. “कुठल्याही परिणामांची तमा न बाळगता, जनतेशी नाळ जोडलेला, जमिनीवरचा, सर्वसामान्यांचा नेता…,” अशा भावना त्यांनी खासदार गोपाळ शेट्टी यांच्याबद्दल व्यक्त केल्या. तब्बल एक लाख आठ हजार एवढी मते मिळवीत, ७२ हजाराचे मताधिक्य दिल्याबद्दल, “मागाठाण्यातील मतदारांचे व कार्यकर्त्यांचे आभार आमदार प्रवीण दरेकर यांनी यावेळी मानले. मागाठाणेचे विविध प्रलंबित सर्व प्रश्न खासदार गोपाळ शेट्टी, पालकमंत्री विनोद तावडे, तसेच सेना भाजप लोकप्रतिनिधी व सरकारच्या  माध्यमातून सोडविले जातील,” असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला. याप्रसंगी शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे, जिल्हाध्यक्ष विनोद शेलार, उपाध्यक्ष व माजी नगरसेवक प्रकाश दरेकर, नगरसेवक गणेश खणकर, ऍड शिवाजी चौगुले व शिवसेना नगरसेविका गीता सिंघन यांची भाषणे झाली. यावेळी, राज्य शासनाच्या स्वयं पुनर्विकास उच्च स्तरीय समितीवर ‘तज्ञ सदस्य’ म्हणून आमदार प्रवीण दरेकर यांची निवड झाल्याबद्दल, तसेच प्रभाग समिती अध्यक्षपदी प्रीतम पंडागळे, तर गृहनिर्माण कायदा समितीवर मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर यांची निवड झाल्याबद्दल, या तिघांचा सन्मान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.

Previous articleविधानसभेसाठी राष्ट्रवादीची जाहीरनामा समिती
Next articleविखे पाटील यांना गृहनिर्माण तर ; सुरेश खाडेना सामाजिक न्याय