मराठी भाषेचा सन्मान आणि संवर्धन व्हावे : छगन भुजबळ
मुंबई नगरी टीम
मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येवून,मराठी भाषेचे संवर्धन व्हावे अशी मागणी राष्ट्रवादी ज्येष्ठ सदस्य छगन भुजबळ यांनी विधानसभेत व्यक्त केली.महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान व्हावा, भाषेचे संवर्धन व्हावे यासाठी भुजबळ यांनी सभागृहात आवाज उठवला.
सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढताना छगन भुजबळ यांनी राज्यावरील कर्जाचा वाढता डोंगर , प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर असलेले ४५ हजारांचे कर्ज आदी मुद्दे उपस्थित करून, राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना सरकार मूलभूत सुविधा पुरवण्यात असमर्थ ठरत आहे अशी टीका केली. राज्याला दुष्काळाच्या अती तीव्र झळा बसत असताना फडणवीस सरकार मात्र नारपारचे पाणी गुजरातकडे वळवू पाहत आहे.सरकारने हे न करता मराठवाड्यासाठी पाणी सोडावे असेही भुजबळ म्हणाले.गुजरातची सिंचन क्षमता ४५ टक्के आहे. त्या तुलनेत महाराष्ट्राची क्षमता कमी आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकल्पासाठी महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका अशी विनंती भुजबळ यांनी केली. गेल्या काही वर्षात चुकीच्या कृषी धोरणांमुळे महाराष्ट्राची कृषी क्षेत्रात प्रचंड पिछेहाट झाली आहे. भविष्यात कृषी क्षेत्राचा विकास खुंटू नये म्हणून सरकारने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे भुजबळ म्हणाले.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात आली असे दावे जरी सरकारने केले असले तरी अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. विमा कंपन्यांनी देखील शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाहीत. राज्य सरकारने किती हप्ता भरला, केंद्राने किती हप्ता भरला, शेतकऱ्यांना किती मोबदला मिळाला हे कळायला हवे, अशी मागणी भुजबळ यांनी केली.राज्यातील बेरोजगारी, कांदा उत्पादक शेतकरी, डबघाईला आलेली शिवशाही, अपघातांचे वाढते प्रमाण, दारुबंदी अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी सभागृहात सरकारला धारेवर धरले.