समाज माध्यमावरून धमक्या देणा-यांवर कारवाई करणार

समाज माध्यमावरून धमक्या देणा-यांवर कारवाई करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : समाज माध्यमांवरून शिवीगाळ करून धमक्या देणारे कोणीही असले आणि त्यात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असले तरीही त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिले.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हे सरकारच्या धोरणावर वारंवार टीका करत असल्याने त्यांना समाज माध्यमातून वारंवार शिवीगाळ करून धमक्या देण्यात येत असल्याचा मुद्दा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटनेते बाळासाहेब थोरात, उपनेते नसीम खान यांनी आज उपस्थित केला. याप्रकरणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दोन दिवासाआधी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन तक्रारही केली होती. काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर अशा प्रकारे धमक्या देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, त्यात भाजपचा कार्यकर्ता असला तरीही त्याची गय केली जाणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले.

 सावंत यांनी २०१५ साली चिक्की घोटाळा उघडकीस आणला होता त्यावेळीही त्यांना धमक्या देत शिवीगाळ करण्यात आली होती. त्याची रितसर तक्रार समतानगर पोलीस ठाणे कांदिवली, मुंबई येथे केली होती. मे महिन्यामध्ये देखील असाच वाईट अनुभव त्यांना आला, त्याचीही तक्रार पोलीस स्थानकात केली. त्यानंतर आता पुन्हा सरकारवर केलेल्या टीकेवरील ट्वीट संदर्भात समाजमाध्यमांवर अत्यंत हीन पातळीवर अर्वाच्च भाषेत सावंत यांना शिवीगाळ करण्यात आली, फोनवरून व समाजमाध्यमांवरून जाहीर धमक्या देण्यात आल्या.

Previous articleमराठी भाषेचा सन्मान आणि संवर्धन व्हावे : छगन भुजबळ
Next articleशिक्षकांना मोठा दिलासा : यावर्षी अकरावीची संचमान्यता करण्यास स्थगिती