अर्थसंकल्पातून पुन्हा गाजरं दाखवण्यात आलीय

अर्थसंकल्पातून पुन्हा गाजरं दाखवण्यात आलीय

मुंबई नगरी टीम

मुंबई :  अर्थव्यवस्थेचा घसरणारा डोलारा सावरण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये उपाययोजना केल्याचं दिसत नाहीच. फक्त ५९ मिनिटात कर्ज देण्याचं गाजर पुन्हा दाखवलं गेलं. असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.

आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पावर बोलताना अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढून ठोस उत्पन्न मिळावं, यासाठी या अर्थ संकल्पात तरतूद नाही! असेही पवार म्हणाले. बळीराजाला डावलून कृषिप्रधान भारताचा विकास होईल का? असा संतप्त सवालही  पवार यांनी केला आहे.

कधी नव्हे तो पेट्रोल-डिझेलचा कमी झालेला दर अतिरिक्त करामुळे वाढण्याच्या मार्गावर आहे. पुन्हा महागाईचा भडका उडणार हे नक्की! सोने-चांदीच्या सीमा शुल्कात २ टक्के वाढीमुळे ते सुद्धा महागणार असल्यानं महिलांचा हिरमोड झाला आहे. स्वस्ताई येणार अशी साधी चुणूकही या अर्थ संकल्पात लागत नाही असेही पवार म्हणाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातलं पहिलं बजेट मांडलं. खरंतर अपेक्षा होती की,सामान्यांच्या हिताचा अर्थसंकल्प सादर होईल.पण अर्थसंकल्पाच्या सादरीकरणानंतर अपेक्षाभंग झालाय. यामुळे एक ना धड, भाराभर चिंध्या अशी अर्थव्यवस्थेची अवस्था न होवो असा उपरोधिक टोलाही  पवार यांनी लगावला आहे.

Previous articleधनिकधार्जिणा व शेतकरी,मध्यमवर्गीयांची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प
Next articleआ. प्रविण दरेकर यांच्या ‘संपर्क अभियाना’चा आजपासून शुभारंभ