गोराई ते बोरिवली दरम्यान रोपवेसाठी डीपीआर तयार करण्यास मान्यता

गोराई ते बोरिवली दरम्यान रोपवेसाठी डीपीआर तयार करण्यास मान्यता

मुंबई नगरी टीम                                                         

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रकल्पांची स्थानकांवर बहुवाहतूक परिवहन एकत्रिकरण प्रकल्प (मल्टि मॉडल इंटिग्रेशन) राबविणे, तसेच गोराई ते बोरिवली व मालाड ते मार्वे या मार्गावर रोपवे वाहतुकीसाठी विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करण्यास मुंबई महानगरविकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीस मंजुरी देण्यात आली.

सह्याद्री अतिथीगृहात प्राधिकरणाची १४८ वी बैठक झाली. यावेळी प्राधिकरणाचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर, मुख्य सचिव अजोय मेहता, गृह निर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मेट्रो प्रणाली उभारणे म्हणजे केवळ एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी पोहचविणारी व्यवस्था नाही. प्रवाशांसाठी ही प्रणाली पूर्णपणे समाधान देणारी असायला हवी. थोडक्यात, केवळ प्रवास करण्यासाठी नव्हे तर समाधानकारक प्रवास करण्यासाठी प्रवाशांना उद्युक्त करणारी प्रणाली उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी मेट्रोमधून उतरल्यानंतर गंतव्य स्थानी पोहोचण्यासाठी योग्य त्या सर्व सुविधा उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे मोनो रेल्वेच्या फेऱ्या वाढविल्यास प्रवाशांची संख्या वाढण्यास मदत होईल. त्यादृष्टिने नियोजन करावे.

यावेळी मुंबईतील विविध मेट्रो स्थानकाच्या ठिकाणी बहुवाहतूक परिवहन एकत्रिकरण प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी रू.३.५ हजार कोटी मंजूर करण्यात आले. या प्रकल्पामुळे मेट्रो स्थानकाच्या परिसरात पादचारी मार्गांचे रूंदीकरण,सायकल मार्ग, वाहनतळ परिसर, रहदारी सिग्नल सुधारणा, रस्त्यावरील दिवे,सी.सी.टी.व्ही. कॅमेरा, स्थळदर्शक नकाशे, मेट्रो स्थानकापासून ये-जा करणाऱ्या बस सेवा, इतर पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण इत्यादी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना अंतिम स्थानकापर्यंत सुविधा मिळणार आहे. याबरोबरच सर्व मेट्रो मार्गांखालील रस्त्यांचा विकासही या प्रकल्पांर्गत करण्यात येणार आहे.

मालाड ते मार्वे आणि गोराई ते बोरिवली या दोन्ही ४.५ कि.मी. लांबीच्या अंतरासाठी रोपवे प्रकल्प कितपत शक्य आहे हे पाहण्यासाठी मे. इंडियन पोर्ट रेल अँड रोपवे कॉर्पोरेशन लि. यांची विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी नेमणूक करण्यात आली. या प्रकल्पांमुळे पूर्व पश्चिम जोडणी निर्माण करता येणार आहे. तसेच मालाड मेट्रो स्टेशन, मार्वे, बोरिवली रेल्वे स्थानक, मेट्रो-२अ आणि गोराई जेटीपर्यंत पोहोचता येणार आहे.सुर्या धरण प्रकल्पाअंतर्गत कवडास बंधाऱ्याचे बांधकाम करण्यासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाला अर्थसहाय्य देण्याचा निर्णयसुध्दा यावेळी घेण्यात आला. प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘जी’ ब्लॉकमधील सी-६५ हा भूखंड मे. गोईसू रियालीटी प्रा.लि. या जपानी कंपनीला रू.२,२३८ कोटी भाडेपटृीवर ८० वर्षासाठी देण्याचा निर्णय झाला. १२ हजार ४८६ चौ.मी. भूखंडावर ६५ हजार चौ.मी. बांधकाम करण्याची कंपनीला परवानगी असेल.

राजीव म्हणाले, न्यूयॉर्क, कोलंबिया, टर्की इत्यादी ठिकाणी रोपवे प्रकल्प लोकप्रिय आणि यशस्वी ठरले आहेत. विशेषत: मुंबईसारख्या शहरांमध्ये लोकांना वाहतूक कोंडीचा सामना नेहमी करावा लागतो. अशा शहरांमध्ये रोपवे प्रकल्प उपयुक्त ठरू शकतो. हा पायलट प्रकल्प यशस्वी ठरला तर असेच आणखी काही प्रकल्प उभारण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महा मुंबई मेट्रो (म ३) संचालन मंडळाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. हा लोगो तीन इंग्रजी एम अक्षरे एकमेकांशी जोडून बनविला आहे. यातून सर्व १२ मेट्रो मार्ग अव्याहत सेवेत व संचलीत असतील आणि एकमेकांशी जोडलेले राहतील असे दर्शविण्यात आले आहे. हिरवा रंग पर्यावरणपोषकता दर्शवितो तर निळा रंग मजबूती आणि विश्वासार्हता दर्शवितो.

Previous articleदुष्काळी भागातील शेतक-यांना विम्याची रक्कम तात्काळ मिळावी
Next articleआता मुंबईत करा फक्त ५ रुपयात “बेस्ट प्रवास”