एसईबीसी विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती लागू

एसईबीसी विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती लागू

मुंबई नगरी टीम

मुंबई : सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास  प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षापासून राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती तसेच डॉ.पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह योजना लागू करण्यात आली असून, यासंदर्भातील शासन आदेश आज जारी करण्यात आला.

एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना  २०१९-२० पासून राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती तसेच डॉ.पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह योजना लागू करण्यासंदर्भात महसूल मंत्री तथा मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत  पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झाला होता. त्यानुसार विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय काढला असून संबंधित विभागांना यासंदर्भातील कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मराठा आरक्षण व एसईबीसी प्रवर्ग कल्याण हा सामाजिक न्याय विभागाच्या २५ जून २०१९ च्या शासन निर्णयान्वये विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही योजनेचा पहिला हप्ता उपलब्ध तरतुदीतून संबंधित विभागाना देण्यास सूचना करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील प्रशासकीय कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता विजाभज, इमाव, विमाप्र कल्याण विभागामार्फत देण्यात येणार आहेत.

Previous articleमाझी लढाई कोण्या व्यक्तीविरूध्द नव्हे तर प्रवृत्ती विरूध्द
Next articleराष्ट्रवादीच्या नेते, कार्यकर्त्यांनो जनाची नाही, मनाची तरी बाळगा