माझी लढाई कोण्या व्यक्तीविरूध्द नव्हे तर प्रवृत्ती विरूध्द

माझी लढाई कोण्या व्यक्तीविरूध्द नव्हे तर प्रवृत्ती विरूध्द

मुंबई नगरी टीम

परळी :  बीड जिल्हयात ज्यांनी ज्यांनी जातीपातीचे राजकारण केले, ते आज नेस्तनाबूत झाले आहेत, त्यामुळे अशा राजकारणाला थारा देऊ नका, विकास हिच जात मी मानते, त्यामुळेच कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्हयात  आणू शकले, भविष्यात विकासाच्याच मागे उभे रहा असे सांगत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री  पंकजा मुंडे यांनी समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचे सांगितले. माझी लढाई कोण्या विशिष्ट व्यक्तीविरूध्द नाही तर प्रवृत्ती विरूध्द आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिल्याबद्दल  मतदारसंघातील मराठा समाज बांधवांनी आज ना. पंकजा मुंडे यांचा भव्य ऋणनिर्देश सोहळा आयोजित केला होता, त्यावेळी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  आ. आर. टी. देशमुख होते. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, मराठा समाजाची आरक्षणाची लढाई गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती, कॅाग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळात प्रमुख पदांवर समाजाचे नेते विराजमान होते, समाजाच्या जीवावर त्यांनी अनेक राजकीय पदं उपभोगली परंतु त्यांच्या मागणीकडे मात्र साफ दुर्लक्ष केले, म्हणूनच समाजाची पिछेहाट झाली व इतके वर्षे आरक्षणासाठी संघर्ष करावा लागला. तत्कालीन सत्ताधा-यांनी ही मागणी संवेदनशीलपणे हाताळली नसल्याने सनदशीर मार्गाने समाजाने आंदोलन केले, त्यांची ही मागणी मान्य करत भाजप सरकारने कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मिळवून दिले आणि त्यांना खरा न्याय मिळाला असे त्या म्हणाल्या.

आरक्षणाच्या लढाईत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब अग्रभागी होते, मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी ते नेहमीच आग्रही होते, सत्तेत आल्यास आम्हीच ते देऊ असे ते म्हणाले होते याची आठवण ना. पंकजाताई मुंडे यांनी करून दिली. मुंडे साहेबांनी माझ्यावर अनेक जबाबदा-या सोपवल्या, त्या पूर्ण करण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊंमुळे आपणांस मिळते असे त्या म्हणाल्या. समाजातील वंचितांसाठी लढा देण्याची त्यांची शिकवण असल्याने शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासाठी लढणार आहे. लोकसभा निवडणुकीत जिल्हयात जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात झाले, ज्यांनी ज्यांनी  हे केले त्यांना जनतेने जागा दाखवली, आज ते पाताळात गेले आहेत. भविष्यात जातीचे नाही तर विकासाचे राजकारण मी करणार आहे, जनतेचा विकास हिच जात मी मानते असे त्या म्हणाल्या.

माझं राजकारण हे भावनेचं नाही तर मी भावनेनं राजकारण करते. जो माणूस  भावनाशुन्य राजकारण करतो, गोरगरिबांच्या जमिनी लाटतो त्याला कोणत्याही पदांवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. माझी लढाई कोण्या विशिष्ट व्यक्तीविरूध्द नाही तर प्रवृत्ती विरूध्द आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. मी कोणत्या पदांच्या लालसेने राजकारणात आले नाही, तुम्हाला आज योग्य  दिशा व विकास देणारा माणूस हवा आहे, अशा माणसांच्याच पाठिशी खंबीरपणे उभा रहा असे सांगून मराठा समाजाला आपण परळी येथे झालेल्या आंदोलनाच्या वेळी जो शब्द दिला होता तो पूर्ण केला असल्याचे त्या म्हणाल्या.

जनतेने कुठलाही नेता निवडताना मराठा-बहूजन अशी करू नये तर चांगला, वाईट किंवा सोज्वळ, क्रुर अशी करावी तरच सर्व घटकांना न्याय मिळतो अशा शब्दांत भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख व शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख वैजनाथ सोळंके यांनी मनोगत व्यक्त केले तर पंकजा मुंडे जे बोलतात तेच करतात असे शिवसेनेचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे यावेळी म्हणाले.

Previous articleशेतकऱ्यांचे बळी घेऊन वृक्षरोपणाचे लक्ष्य साध्य करणार काय
Next articleएसईबीसी विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती लागू