सफाई कामगारांच्या मुलांसाठी धनंजय मुंडेंनी घेतला मोठा निर्णय;शिष्यवृत्ती केली दुप्पट

मुंबई नगरी टीम

  • पहिली,दुसरी व तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार २२५० रुपये
  • एकरकमी रु. ७५० सह वर्षाला मिळणार ३००० रुपये शिष्यवृत्ती
  • कामगारांच्या पाल्यांना या निर्णयामुळे दामदुप्पट लाभ मिळणार

मुंबई । राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सफाई कामगार व आरोग्यास धोका असणाऱ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना ‘गुड न्युज’ दिली आहे. सरकारच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेत आता बदल करण्यात आले असून विद्यार्थ्यांना दर महिन्याला दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली आहे.

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेच्या लाभात काही भरीव बदल करण्यात आले असून, याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयानुसार पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांना पूर्वी प्रतिमहिना ११० रुपये शिष्यवृत्ती मिळत असे ती वाढवुन आता प्रतिमहिना २२५ रुपये करण्यात आली आहे. तिसरी ते दहावीतील विद्यार्थ्यांना महिना ११० रुपये मिळत असे, तेही वाढवून आता २२५ रुपये करण्यात आले आहे. तर वर्षाला मिळणारे एकत्रित मानधन हे पूर्वीप्रमाणे रुपये ७५० इतकेच असणार आहे. विद्यार्थ्यांना पूर्वी वर्षाला १८६० रुपये मिळत, नवीन नियमानुसार झालेल्या वाढीनंतर वर्षाला एकूण ३००० रुपये मिळणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

वसतिगृहात राहणाऱ्या तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ७०० रुपये व वार्षिक अनुदान १००० रुपये या पूर्ववत नियमाप्रमाणेच सुरू राहील असेही या शासनानिर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील सफाईच्या क्षेत्रात व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या पाल्यांना या निर्णयामुळे दामदुप्पट लाभ मिळणार आहे.विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही जात,धर्म याचे बंधन असणार नाही हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

Previous articleनाना पटोलेंसह बाळासाहेब थोरात,मंत्री आणि आमदार सायकलवरून पोहचले विधानभवनात
Next articleकोरोना होता मग सांगली महापालिकेची निवडणुक कशी घेतली : चंद्रकांत पाटलांचा सवाल