कुणी वेगळा निर्णय घेत असतील तर त्यांना शुभेच्छा!
मुंबई नगरी टीम
सातारा : साताऱ्यातून आणखी किती लोक पक्ष सोडून जाणार आहेत याची मला कल्पना नाही. मात्र, यशवंतराव चव्हाणांचा विचार ज्यांनी स्वीकारला आहे ते असे काही करणार नाहीत. त्यांना विरोधात असल्याचा त्रास होईल. मात्र, त्यांची नाळ मतदारांशी असल्याने चिंता करण्याची गरज नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत मांडली. पक्षातील कुणी मंडळी जर काही वेगळा निर्णय घेत असतील, तर आमच्या त्यांना शुभेच्छा! असा पवार यांनी लगावला.
शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये गेल्याचा कोणताही परिणाम साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसवर होणार नाही. साताऱ्याच्या उमेदवारीसाठी माझ्याकडे तीन अर्ज आले आहेत. मला उमेदवारांची चिंता नाही. ही जागा राष्ट्रवादी निश्चित राखेल असेही शरद पवार यांनी सांगितले.भाजपमध्ये जाणार नाही असे शिवेंद्रराजेंनीच मला सांगितले होते. साताऱ्याच्या खासदारांसोबत बैठक व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. संसदेच्या अधिवेशनानंतर चर्चा करू असे आमचे ठरले होते. मात्र, त्याआधीच त्यांनी वेगळा निर्णय घेतला अशी स्पष्ट माहिती पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
पक्षातील कुणी मंडळी जर काही वेगळा निर्णय घेत असतील, तर आमच्या त्यांना शुभेच्छा! असा टोलाही पवार यांनी लगावला.राजकारणात कधी कधी असा प्रसंग येतो,त्याचा सामना करायचा मला अनुभव आहे. एक गोष्ट चांगली आहे, सरकार येणार नाही म्हणून ते चालले आहेत हे त्यांनी जाहीर केले असेही पवार म्हणाले. राष्ट्रवादीच्या आमदारांनी पक्ष सोडताना कामे होत नसल्याची कारणे दिली आहेत. ते एक बरंच झाले. सत्ताधारी सूडबुद्धीने वागताहेत आणि विरोधक त्यांना तोंड देऊ शकत नाहीत असा निष्कर्ष यातून निघतो असेही पवार म्हणाले.