गेल्या पाच वर्षांत सरकारला काहीही करता आलं नाही
मुंबई नगरी टीम
जालना : आमच्या सत्तेच्या कालावधीतच विकासकामे झाली.आम्ही करुन दाखवलं आहे परंतु यांना पाच वर्षांत काहीही करता आलेले नाही असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला.
जालना जिल्ह्यातील बदनापुर येथे शिवस्वराज्य यात्रेची दुसरी सभा पार पडली त्यावेळी ते म्हणाले. ५४ वर्षात अडीच लाख कोटी रुपये कर्ज झाले होते परंतु तेच या सरकारने पाच वर्षांत पाच लाख कोटीवर कर्ज नेवून ठेवलं आहे याचा जाब विचारायचा नाही का? असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला. माझ्या शेतकऱ्यांना पीकविमाचे पैसे सरकार देत नाही. सरकार तुमचं… मग कसलं आंदोलन करता, कशाला लोकांची फसवणूक करता असा सवालही पवार यांनी शिवसेनेला केला.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं सरकार… बदनापुर नगरपंचायतीमध्ये सत्ता भाजपाची मग एक- एक महिना लोकांना का पाणी देत नाही असा सवालही पवार यांनी केला. या नाकर्ते सरकारच्या काळात १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील जनता वा-यावर पडली आहे का ? असा संतप्त सवाल करतानाच अजितदादा पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सेना – भाजप जे राजकारण करतेय तशापध्दतीचे अजितदादा पवार यांनी राजकारण केलं असतं तर भाजप- सेनेचे बी सुद्धा दिसले नसते असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बदनापुरच्या जाहीर सभेत दिला.या सरकारने मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचे जाहीर केले खरे परंतु होते नव्हते ते ढगच सध्या गायब झाले आहेत आणि आज उन्हाच्या झळा मराठवाडा सोसत आहे असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला