शिवसेना १ लाख पूरग्रस्त विद्यार्थ्यांना पुरविणार दप्तरे
मुंबई नगरी टीम
मुंबई : पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात ओढवलेल्या अभूतपूर्व पूर संकटाचा खंबीरपणे मुकाबला करणाऱ्या पूरग्रस्त जनतेसाठी शिवसेना भक्कमपणे उभी राहिली. अन्नधान्य,चादरी व ब्लॅकटे, २५ हजार रुग्णांना पुरतील इतकी औषधे, संसारोपयोगी चिजवस्तु आणि पिण्याचे पाणी घेऊन सुमार १०० वाहने पुरप्रस्त भागात ऐन आणिबाणीच्या क्षणी पोहोचली. वाटप व मदतकार्यात हजारो शिवसैनिकांनी भाग घेतला व आपदग्रस्तांना, ‘शिवसेना तुम्हाला एकटे पुराच्या विळख्यात सोडणार नाही असा दिलासा दिला.
पूरग्रस्त मंडळी आपला संसार नव्याने उभारण्याच्या खटपटीस लागली आहेत. या पुढचा टप्पा म्हणून शिवसेनेने आता शालेय विद्यार्थ्यांच्या पाठिशीही तितक्याच ठामपणे उभे राहाण्याचे ठरविले आहे. त्यादृष्टीने पूर्वतयारी वेगाने सुरु झाली असून पूराचा फटका बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दप्तर (स्कूलबॅग) व त्यामध्ये वह्या, पेन्सिली, बॉलपेन, पट्टी इत्यादी सह शैक्षणिक साहित्य दिले जाणार आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील ४९ हजार २९१, सातारा जिल्ह्यातील ५ हजार ९१० व सांगली जिल्ह्यातील २८ हजार ८६३ तसेच कोकणातील १६ हजार असे मिळून १लाख पुरग्रस्त विद्यार्थ्यांना दप्तरे व लेखनसाहित्य दिले जाणार आहे.