शिक्षकांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा

शिक्षकांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने आझाद मैदान येथे सुरू केलेले आंदोलन पोलिसांनी बळाचा वापर करुन दडपण्याचा प्रयत्न केला आहे.  शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांना  तात्काळ निलंबित करा आणि शिक्षकांच्या मागण्यांना न्याय द्यावा अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

शिक्षक लाठीचार्जवर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले की, मराठी तसेच प्रादेशिक भाषेतील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या अनुदानाचा प्रश्न १९ वर्षांपासून प्रलंबित आहे, त्यांना अनुदान द्यावे तसेच ज्या माध्यमिक शाळांना २० टक्के अनुदान सुरू केले आहे, त्यांना नियमानुसार १०० टक्के अनुदान द्यावे या मागण्यांसाठी शिक्षक संघटनेने आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश देऊनही मंत्रालयातले काही अधिकारी कार्यवाही करण्यास जाणूनबुजून उशीर करत असल्याचे दिसत आहे. आपल्या न्याय मागण्यांसाठी शिक्षकांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला असताना त्यांच्यावर लाठीचार्ज करण्याची गरज का भासली ? आपल्या विविध मागण्यांसाठी २१ दिवसांपासून शिक्षक मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करण्याऐवजी त्यांच्या मागण्या पोलीस बळाचा वापर करुन दडपून टाकणे हे अन्यायकारक असून या पोलीस लाठीचार्जचा वडेट्टीवार यांनी निषेध केला.

Previous articleशिवसेना १ लाख पूरग्रस्त विद्यार्थ्यांना पुरविणार दप्तरे
Next articleराज्य सरकार फक्त घोषणा करण्यात पटाईत