मंत्रिमंडळाने घेतले तब्बल २५ महत्वाचे निर्णय
मुंबई नगरी टीम
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने सर्वच घटकांना खुष करण्याचा प्रयत्न करण्याचा सपाटा लावला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल २५ महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांच्या मानधनात दीडपटीने वाढ करण्यासोबतच विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले महत्वाचे निर्णय पुढील प्रमाणे
१ ) राज्यातील मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांच्या मानधनात दीडपटीने वाढ.
२ ) मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेच्या टप्पा २ व ३ ला मान्यता.
३ ) सदनिकांच्या मालकी अधिकाराची नोंद अभिलेखात घेण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल नियम २०१९ नव्याने तयार करण्यात येणार.
४ ) शासकीय आश्रमशाळांचे इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमामध्ये रुपांतर करण्याचा निर्णय.
५ ) नाशिक महानगर प्रदेश क्षेत्रात सार्वजनिक जलद परिवहन व्यवस्था प्रकल्पांर्गत मेट्रो प्रकल्प राबविण्यास मान्यता.
६ ) मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त व बिगर उपकरप्राप्त इमारतींचा समूह पद्धतीने पुनर्विकास करण्यासाठी म्हाडा अधिनियमात सुधारणा.
७ ) विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यास मान्यता.
८ ) शासकीय वैद्यकीय, दंत व आयुर्वेद आणि शासन अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील आंतरवासितांचे विद्यावेतन सहा हजारांवरून अकरा हजार रुपये.
९ ) कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन व संशोधन केंद्र सुरू करण्यास मान्यता.
१० ) राज्यातील शहरांमधील विघटनशील (ओल्या) कचऱ्यापासून तयार करण्यात येणाऱ्या कंपोस्ट खत निर्मितीला चालना देण्यासाठी प्रोत्साहन अनुदान.
११ ) बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाला तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता.
१२ ) पर्यटन प्रकल्पांना देय असलेली वित्तीय प्रोत्साहने वितरित करण्याबाबत.
१३ ) महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक अंतर्गत एकलव्य निवासी शाळांमध्ये पहिले ते पाचवीचे वर्ग सुरू करण्यात येणार.
१४ ) नागपूरच्या मिहान प्रकल्पास सुधारित प्रशासकीय व वित्तीय मान्यता.
१५ ) वर्धा येथे नवीन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सुरू करण्यास मान्यता.
१६ ) कायमस्वरुपी बंद करण्यात आलेल्या आदिवासी विभागाच्या अनुदानित आश्रमशाळा ठाणे जिल्ह्याच्या कल्याण येथील अखिल भारतीय मागासवर्गीय समाज प्रबोधन संस्थेस हस्तांतरित व स्थलांतरित करून आदिम जमातीतील विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा चालविण्यास मान्यता.
१७ ) राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून महाराष्ट्र शासनामार्फत खेळत्या भागभांडवलासाठी मार्जिन मनी लोन सहकारी साखर कारखान्यांना उपलब्ध करण्यात येणार.
१८ ) नाशिकच्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाला राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त विकास महामंडळाकडून कर्ज स्वरुपात निधी मिळण्यासाठी शासन हमी.
१९ ) नागपूरच्या मौजा बिनाकी येथील बिनाकी हाऊसिंग स्कीममधील झोपडपट्टी वसाहतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या लाभात होणाऱ्या दस्तावरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मंजुरी.
२० ) मुंबई येथे हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलिजिएट युनिव्हर्सिटी स्थापन करण्यास मान्यता.
२१ ) महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम-१९४९ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता. अवैध साठा, विक्री केल्यास शिक्षेत वाढ.
२२ ) मिशन मंगल या हिंदी चित्रपटास राज्य जीएसटी कराच्या परताव्यासाठी शासन निर्णय काढण्यास मान्यता.
२३ ) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ४८(८) मध्ये सुधारणा.
२४ ) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २४-अ मध्ये सुधारणा करण्याबाबत. अध्यादेश पुन्हा जारी करण्यास मान्यता.
२५ ) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमामध्ये सुधारणा करणार. सरपंच, पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास पुरेसा कालावधी मिळणार.