राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री जनतेमध्ये जात आहे

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री जनतेमध्ये जात आहे

मुंबई नगरी टीम

कणकवली : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि मंत्री पाच वर्षे राज्यकारभार केल्यानंतर जनतेमध्ये जात आहेत आणि आपण काय काम केले ते सांगत आहेत. तसेच काय काम राहिले हे समजून घेत आहेत आणि पुन्हा नव्याने जनादेश प्राप्त करत आहेत असे सांगून,महाजनादेश यात्रेला महाराष्ट्रातील जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला आणि आशिर्वाद दिला. त्यामुळे आगामी काळात अधिक काम करण्याचा विश्वास निर्माण झाला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे सांगितले.

महाजनादेश यात्रेदरम्यान आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, यात्राप्रमुख व प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या आणि आ. प्रसाद लाड, प्रदेश सचिव प्रवीण दरेकर आणि राजन तेली, आ. निरंजन डावखरे, आ. कालिदास कोळंबकर, भाजपा सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार आणि माजी आ. अजित गोगटे उपस्थित होते.

 फडणवीस म्हणाले की, महाजनादेश यात्रेमध्ये राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि मंत्री पाच वर्षे राज्यकारभार केल्यानंतर जनतेमध्ये जात आहेत आणि आपण काय काम केले ते सांगत आहेत. तसेच काय काम राहिले हे समजून घेत आहेत आणि पुन्हा नव्याने जनादेश प्राप्त करत आहेत. महाजनादेश यात्रेला जनतेने जो प्रचंड प्रतिसाद दिला आणि आशिर्वाद दिला त्यामुळे आगामी काळात अधिक काम करू असा विश्वास निर्माण झाला आहे.

त्यांनी सांगितले की, आपण महाजनादेश यात्रा काढली तशा यात्रा विरोधकांनीही काढल्या. आमच्या यात्रेसाठी जमणाऱ्या गर्दीला मैदाने पुरत नाहीत आणि विरोधकांसाठी मंगल कार्यालयेही भरत नाहीत. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होती त्यावेळी त्यांना सत्तेची मुजोरी होती. त्यांना जनतेचा विसर पडला होता. आता जनतेला त्यांचा विसर पडला आहे. आगामी पंचवीस वर्षे काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर येणार नाही.

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे आपण आभारी आहोत की, केंद्राने प्रथमच मासेमारी करणाऱ्यांसाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करून विशेष निधी उपलब्ध केला आहे आणि मासेमारी करणाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात सोई उपलब्ध करून दिल्या. गेल्या पाच वर्षात आमच्या सरकारने राज्यातील पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांना मदत केली. पर्ससिन मासेमारीमुळे जो मत्स्यदुष्काळ निर्माण होत होता तो संपविण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रमाणात परप्रांतिय मासेमारी करणाऱ्यांचे आणि परदेशातून येणाऱ्यांचे अतिक्रमण होते, ते थांबविण्यासाठी केंद्रात कायदा करण्याचे काम चालू आहे. १२ सागरी मैल ते २०० सागरी मैल या टापूत होणाऱ्या अनधिकृत मासेमारीवर बंदी घालण्यात येत आहे. एलईडीमुळे नवीन मत्स्य दुष्काळ होत आहे, अशा मासेमारीवर बंदी आणत आहोत.

 फडणवीस म्हणाले की, कोकणात प्रचंड पाऊस पडतो, पण पाणी वाहून जाते आणि अनेक ठिकाणी पाण्यासाठी टँकर देण्याची वेळ येते. आगामी तीन वर्षात आपल्या सरकारला गावांमध्ये अशा सुविधा तयार करायच्या आहेत की, पाणीसाठा होईल आणि कोकणात एकाही गावात टँकर लावायची वेळ येऊ नये. पाणी साठवून पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ होऊ नये, असे काम हाती घेतले आहे.

त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे मुंबई गोवा एक्स्प्रेस वेचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. काही टप्प्यात काम रखडले आहे ते आम्ही वेगाने पूर्ण करणार आहोत. रस्ते, बंदरे आणि चिपीचा विमानतळ यामुळे मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार असून निर्यात करता येईल. काजू आंब्याला मोठी बाजारपेठ मिळेल.

Previous articleपवारांनी जो सन्मान दिला तितका सन्मान भाजपच्या सात पिढ्यासुद्धा देणार नाही
Next articleविचार करा !  नारायण राणेंना भाजपा प्रवेशासाठी किती ताटकळावे लागणार ?