पवारांनी जो सन्मान दिला तितका सन्मान भाजपच्या सात पिढ्यासुद्धा देणार नाही

पवारांनी जो सन्मान दिला तितका सन्मान भाजपच्या सात पिढ्यासुद्धा देणार नाही

मुंबई नगरी टीम

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी कार्यकर्ता मेळाव्यालाही संबोधित केले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेही उपस्थित होते.

आपल्या भाषणा दरम्यान धनंजय मुंडे यांनी पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांना आपल्या भाषणाच्या माध्यमातून  चिमटे काढले. पवार साहेबांनी जो सन्मान दिला तितका सन्मान त्यांना ( सोडून गेले त्यांना )  भाजपच्या सात पिढ्यासुद्धा देणार नाही असे ते म्हणाले. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर निशाणा साधताना मुंडे म्हणाले की, राजकारणाची समज नसताना ज्यांनी राज्यमंत्रीपद दिले, प्रतिष्ठा दिली, एवढं सगळं वैभव अनुभवण्याची संधी दिली त्याच व्यक्तीला काही जण सोडून गेले. अशा गद्दारांना उस्मानाबदची जनता याच मातीत यांना गाडल्याशिवाय राहणार नाही.

आपल्या भावना व्यक्त करताना मुंडे म्हणाले की, राजे गेले, सरदार गेले, सेनापती गेले अभिमान वाटतोय माझ्या या राष्ट्रवादीच्या सच्चा मावळ्यांचा जे आजही पवार साहेबांच्या पाठिशी खंबीपणे उभे आहेत. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तो पर्यंत पवार साहेबांचा पुरोगामी विचार या मातीत रूजवल्याशिवाय स्थिर राहणार नाही.

भाजपच्या मेगाभरतीवर टीका करताना मुंडे म्हणाले की, आता भाजपमध्ये सुद्धा विभाजन झालंय- भाजप ओरिजनल, आणि भाजप नवभरती. भाजपच्या अध्यक्षांची आमच्या मातीत येऊन, पवार यांच्याविषयी बोलण्याची हिंमत कशी होते. पवारांनी महाराष्ट्रात जितकी विमानतळं बांधली तितकी बस स्थानकं सुद्धा गुजरातमध्ये बांधली नसतील अशी टीका त्यांनी अमित शाह यांच्यावर केले. २१व्या शतकातील छत्रपतींचा इतिहास काय असेल तर आपले दैवत शिवाजी महाराज यांच्या घराण्यात फुट पाडणाऱ्या अनाजी पंतांचे नेतृत्व छत्रपतींच्या वारसांनी स्विकारलं. ज्यांच्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराजांचा सळसळता स्वाभिमान आहे त्यांचा हा घोर अपमान आहे अशी खंत मुंडे यांनी व्यक्त केली.

Previous articleराज्य सेवा परीक्षेतील ५०६ उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीला मान्यता
Next articleराज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री जनतेमध्ये जात आहे