मनसे विधानसभा निवडणुक लढविणार ?
मुंबई नगरी टीम
मुंबई : मनसे आगामी विधानसभा निवडणुका लढविण्याच्या मनःस्थितीत असून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच याची घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष राज्यातील विधानसभा निवडणुका लढविणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला असतानाच मनसे विधानसभा निवडणुक लढविण्याची शक्यता निर्माण जाली आहे.मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आदींनी आज राजगड या पक्षाच्या मुख्यालयात पक्षाच्या मुंबईतले सर्व विभागाध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बैठक घेतली. विधानसभा निवडणूक लढवायची असल्यास पक्षाची संघटनात्मक ताकद किती आहे, याचा यावेळी आढावा घेण्यात आला. निवडणूक लढवायची की नाही याची यावेळी चाचपणी करण्यात आली. या बैठकीत सर्व उपस्थितांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली, असे नांदगावकर सांगितले.
या बैठकीत व्यक्त झालेल्या मतांवर आधारीत एक अहवाल तयार केला जाईल व तो पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे सादर केला जाईल. त्यावर ते जो निर्णय घेतील तो जाहीर केला जाईल. इव्हीएमविरोधात आमची भूमिका होती व आहे. ती आजही कायम आहे. लोकसभेची निवडणूक आम्ही लढवली नव्हती. परंतु विधानसभा निवडणूक लढवावी असा पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे. निवडणूक लढविल्यास प्रचाराला कोणी जायचे, कधी जायचे याचा निर्णय घेतला जाईल. अमित ठाकरे आजही पक्षाच्या कामात सक्रीय आहेत, असेही नांदगावकर म्हणाले.