खूशखबर ! राज्य सरकारी कर्मचा-यांना दिवाळीपूर्वी मिळणार पगार

खूशखबर ! राज्य सरकारी कर्मचा-यांना दिवाळीपूर्वी मिळणार पगार

मुंबई नगरी टीम

मुंबई :राज्य सरकारी कर्मचा-यांना खूशखबर आहे. दिवाळीचा सण लक्षात घेऊन सरकारने कर्मचा-यांना नोव्हेंबरला होणारा पगार आठ दिवस आधी २४ ऑक्टोबरलाच देण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळणार आहे. याचा लाभ पेन्शनधारकांनाही मिळणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

सरकारी कर्मचा-यांना दर महिन्याच्या १ तारखेला पगार दिला जातो. मात्र यंदा दिवाळीचा सण महिनाअखेरीस आल्याने कर्मचा-यांची गैरसोय होऊ नये यासाठी आठ दिवस आधीच पगार देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यापूर्वीही अनेकदा सरकारकडून असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अनेक शाळा, कार्यालयांकडून सरकारचे आदेश धाब्यावर बसविले जातात. यंदा तरी सरकारने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी केली जाणार का याकडे कर्मचा-यांचे लक्ष लागले आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयाची अंमलबजावणी आता राज्य सरकारलाही करावी लागणार आहे. यासाठी सरकारी कर्मचारी संघटनाही आग्रही असून नोव्हेंबरच्या पगारात ही वाढ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Previous articleपावसामुळे राज ठाकरेंची पुण्यातील सभा रद्द
Next articleविकासकामांच्या जोरावर भाजप सेना युती मोठ्या बहुमताने सत्तेवर येईल