पावसामुळे राज ठाकरेंची पुण्यातील सभा रद्द

पावसामुळे राज ठाकरेंची पुण्यातील सभा रद्द

मुंबई नगरी टीम

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात होणारी पहिली प्रचार सभा पावसामुळे रद्द करावी लागली आहे. ईडीच्या चौकशीनंतर मनसेचे अध्यक्ष काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहीले होते. राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग पुण्यातून फुकणार होते. काल झालेल्या पावसामुळे पाऊस सभा रद्द होऊ नये म्हणून  मैदान सुकवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले मात्र आज पुन्हा मुसळधार झालेल्या पावसामुळे अखेर सभा रद्द करावी लागली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातील आपल्या पहिल्या सभेतून विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करणार होते.काल झालेल्या पावसामुळे मैदानात मोठ्या प्रमाणात चिकल साठला होता. मात्र कार्यकर्त्यांनी मैदान सुकवण्याचा प्रयत्न केला पण सभेपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अखेर आजची सभा रद्द करावी लागली.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उद्या मुंबईतील सांताक्रुझ पूर्व आणि गोरेगाव पूर्व येथे जाहीर सभा होणार आहे. ईडीच्या चौकशीनंतर शांत असलेले राज ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.मनसे विधानसभा निवडणुका लढविणार की नाही याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. अखेर राज ठाकरे यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.आपल्या पहिल्याच सभेत ते कोणाचा समाचार घेणार याची उत्सुक्ता होती मात्र पावसाने सभेवर पाणी फिरविल्याने उद्याच्या मुंबईतील सभेत राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous articleअजितदादा शॉर्ट फॉर्ममध्ये कोणत्या नेत्याला म्हणाले “चंपा”
Next articleखूशखबर ! राज्य सरकारी कर्मचा-यांना दिवाळीपूर्वी मिळणार पगार