जनतेची फसगत करण्याची सध्याच्या राज्यकर्त्यांची वृत्ती

जनतेची फसगत करण्याची सध्याच्या राज्यकर्त्यांची वृत्ती

मुंबई नगरी टीम

हिंगणा : ५० हजार कोटीची मदत शेतकऱ्यांना केली. कोणाला केली ? हे मुख्यमंत्री सांगा असा सवाल करतानाच बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात या उक्तीप्रमाणे रेटून खोटं बोलून राज्यातील जनतेची फसगत करायची सध्याच्या राज्यकर्त्यांची वृत्ती आहे  थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथील जाहीर सभेत केला.

काही लोक म्हणतात मोदींना लोकसभा निवडणुकीत मोठे यश आले. पण यश कशाच्या जोरावर आले ? पुलवामा येथे काही गोष्टी घडल्या त्यामुळे सरकारने निर्णय घेतला. हा निर्णय काही एकट्या दुकट्याने घेतलेला नाही. सर्वपक्षीय नेत्यांनी निर्णय घेतला की, भारतावर कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्यांना धडा शिकवायचा. ही सगळी कामगिरी सैन्याने केली. मात्र सध्याच्या राज्यकर्त्यांनी त्याचे श्रेय घेतले असाही आरोप  पवार यांनी केला.

आजही लोक पुलवामा, ३७० कलमावर मतं मागत आहेत. भाजपचे लोक आज विचारत आहेत की, ३७० वर राष्ट्रवादीची भूमिका काय ? लोकसभेत काहीजण विरोध करत होती. लोकांचं म्हणणे ऐकून घेतले नाही. लोकांशी चर्चा केली नाही. विरोध न जुमानता निर्णय घेतला गेला. आता त्यावर मतं मागितली जात आहे. ३७० करणाऱ्यांनी ३७१ चे काय ? याचे उत्तर द्यावे. ३७१ कलमामुळे ईशान्य भारतातील जमिनी घेता येत नाही. लोकांना फसवण्याचे काम सुरू आहे असेही पवार म्हणाले.

बेरोजगारीची चिंता सरकारला नाही. सरकारला भलत्याच गोष्टींची चिंता आहे. कारखाने बंद झाले म्हणून अनेक लोकांचे रोजगार गेले. जेट एअरवेज कंपनी बंद पडली त्यामुळे २२ हजार तरुणांचा रोजगार गेला. सरकारने समन्वय साधायला हवा होता पण सरकारने ते केले नाही. सरकार बेरोजगारीला जबाबदार आहे. महागाई वाढली आहे त्यामुळे जनतेवर दुहेरी संकट आहे. याला सरकार जबाबदार आहे असेही पवार म्हणाले.पी. चिदंबरम यांना अटक झाली. आरोप खरे की खोटे माहिती नाही. पण जाणूनबुजून त्रास द्यायचा प्रयत्न सुरू आहे. माझ्यावर संकट आणण्यासाठी प्रयत्न झाला. ईडीची नोटीस मला बजावली. काही देणं घेणं नसताना गुन्हा दाखल केला गेला. त्यामुळे मीच ठरवले ईडीच्या कार्यालयात जावून त्यांना हवी ती माहिती द्यावी.  मी तिथे जाणार म्हणून सगळे खडबडून जागे झाले. सर्व यंत्रणा मला न जाण्यासाठी रोखू  लागली. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मी तिथे न जाण्याचा निर्णय घेतला. मला इतके त्रास देवू शकतात तर सामान्य माणसांना किती त्रास देतील याची कल्पना करा असे सांगतानाच म्हणून आपल्याला या सरकारला सत्तेतून खाली उतरवायचे आहे असे आवाहन  पवार यांनी केले.

आज नागपूरच्या वर्तमानपत्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोसहीत सरकारची जाहिरात आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक सरकारला पाच वर्षात बांधता आले नाही. जलपूजन,भूमीपूजन झाले मात्र एक इंचभरही काम झालं नाही. दोन्ही स्मारकाबाबत शासन उदासीन आहे असेही  पवार म्हणाले.नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. नागपूर पूर्वी त्याच्या वैभवासाठी ओळखलं जायचं. मात्र आज नागपूर क्राईम कॅपिटल म्हणून ओळखलं जातंय. या नागपूरचं प्रतिनिधीत्व फडणवीस करतात. फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्रीही तेच आहेत. जर तिथे कायदा व सुव्यवस्था नसेल तर ही तुमची आमची बदनामी आहे अशी जोरदार टीकाही पवार यांनी केली.राज्यात परिवर्तन करून तुम्हाला एक दिशा दाखवायची आहे. ज्याप्रमाणे छत्तीसगढ, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यातील लोकांनी भाजपला परतवून लावले त्यापद्धतीने महाराष्ट्रात आपल्याला भूमिका घ्यायची आहे असे जबरदस्त आवाहन पवार यांनी जनतेला शेवटी केले.

Previous articleविकासकामांच्या जोरावर भाजप सेना युती मोठ्या बहुमताने सत्तेवर येईल
Next articleराणेंचं ठरलं… १५ ऑक्टोबरला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करणार