सुप्रिया सुळेंच्या हेलिकॉप्टरची पथकाकडून तपासणी

सुप्रिया सुळेंच्या हेलिकॉप्टरची पथकाकडून तपासणी

मुंबई नगरी टीम

मुंबई :  विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी एका दिवसाची अवधी शिल्लक असतानाच आता निवडणूक यंत्रणाही दक्ष झाल्याचे दिसून येते. राज्यात सर्वच मतदारसंघात सध्या तपासणी नाक्याच्या माध्यमातुन वाहनांची तपासणी करण्यात येत असतानाच आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी फिरत्या पथकाकडून करण्यात आली.या तपासणीनंतर त्या पुढील प्रचारासाठी पुण्याला रवाना झाल्या.

निवडणूक काळात राज्यातील प्रत्येक मतदारसंघात तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. या तपासणीत मोठ्या प्रमाणात रोकड आणि मद्य पकडण्यात आले आहे.उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस असून,सर्वसामान्य नागरीकांप्रमाणेच नेत्यांनाही या तपासणीच्या फे-यातून जावे लागते आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या आज मुंबईतील महालक्ष्मी रेस कोर्सवरून हेलिकॉप्टरने पुण्याला प्रचारासाठी रवाना होणार होत्या मात्र त्याच्या हेलिकॉप्टरची फिरत्या तपासणी पथकाकडून तपासणी करण्यात आली. त्याच्या हेलिकॉप्टरमध्ये कसलेही आक्षेपार्ह साहित्य आढळून आले नसल्याने या तपासणीनंतर त्यांच्या हेलिकॉप्टरने पुण्यासाठी झेप घेतली. त्यांची पुण्यात सभा असल्याने काही वेळ त्यांचा या तपासणीत गेला. मात्र या तपासणी दरम्यान त्यांनी संबंधीत यंत्रणांना संपूर्ण सहकार्य केल्याचे कळते. यापूर्वीही निवडणूक काळात अनेक बड्या नेत्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी  फिरत्या तपासणी पथकाकडून करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Previous articleराष्ट्रवादीची अवस्था २०१४ पेक्षाही बिकट होईल !
Next article५४.५ टक्के जनतेला नवा मुख्यमंत्री हवाय !