पहिला निकाल ११ वाजता हाती येणार
मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल उद्या म्हणजेच गुरूवारी जाहीर होणार असून, मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी पंचवीस हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली आहे.राज्यात सर्वात कमी मतदान कुलाबा, डोंबिवली आणि कल्याण पश्चिम मतदारसंघात झाले आहे. या मतदारसंघातील निकाल अकरा वाजेपर्यंत लागण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे की महाआघाडीचे राज्य येणार हे स्पष्ट होणार आहे त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
विधानसभा निवडणूकीत शिवसेना भाजप मित्र पक्षांची महायुती, कॅांग्रेस आणि राष्ट्रवादी मित्र पक्षांची महाआघाडीसह वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीने उतरली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह आदित्य ठाकरे यांनी राज्यातील विविध भागात प्रचार सभा घेवून वातावरण निर्मिती केली होती.विविध खाजगी वृत्त वाहिन्यांच्या कल चाचणीत महायुतीला जास्त जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे उद्याचा निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील जनतेने कोणाला कौल दिला आहे हे उद्या म्हणजेच गुरूवारी स्पष्ट होणार आहे.काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी महायुतीच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे केल्याचे चित्र आहे तर मुंबईसह राज्यातील काही मतदारसंघात महायुतीत झालेल्या बंडखोरीमुळे शिवसेना भाजपला फटका बसतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.राज्यातील सर्वच मतमोजणी केंद्रांवर उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होईल.
दरम्यान सर्व मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे २ वेळा प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. २६९ ठिकाणी २८८ केंद्रावर ही मतमोजणी होणार आहे. एका मतदारसंघासाठी मतदान केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात १४ ते २० टेबल ठेवण्यात येतात. एका टेबलसाठी एक पर्यवेक्षक, दोन सहाय्यक असे तीन मतमोजणी कर्मचारी आणि प्रत्येकी एक सूक्ष्म निरीक्षक असतो. मतदारसंघातील ५ बूथच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते. हे पाच बूथ चिठ्ठी टाकून उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि निरीक्षक यांच्या उपस्थितीत निवडले जातात. व्हीव्हीपॅट मधील चिट्ठीतील मते आणि ईव्हीएमवरील मतांची पडताळणी यावेळी केली जाते. प्रारंभी टपाली मते आणि बारकोडद्वारे इटीपीबी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट) मोजली जातील.प्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. प्रत्येक टेबलला स्ट्रॉंग रूम पासून ईव्हीएम ने-आण करण्यासाठी वेगळे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.स्ट्रॉंगरूम तसेच मतमोजणी केंद्रामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. स्ट्रॉंगरूम मधून मतपेट्या बाहेर काढणे मतमोजणी व नंतर पेट्या स्ट्रॉंग रूममध्ये जमा करणे या सर्व बाबींचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे.संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक (ऑब्झर्वर) उपस्थित राहतील. फेरीनिहाय मतमोजणीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतील. सर्वसामान्यांना मतमोजणीची माहिती मिळावी यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत.मतमोजणी केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्ट्रॉंगरूमला केंद्रीय सशस्त्र पोलीस बल, राज्य राखीव पोलीस बल आणि स्थानिक पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे.
राज्यात सर्वात कमी मतदान कुलाबा मतदार संघात ४०.११ टक्के, डोंबिवली मतदारसंघात ४०.७२ तर कल्याण पश्चिम मतदारसंघात ४१.७४ टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघातील निकाल सर्वात लवकर लागून पहिला निकाल सकाळी ११ वाजता हाती येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.