अजित पवार सर्वांधिक तर दिलीप लांडे सर्वात कमी मतांनी विजयी

अजित पवार सर्वांधिक तर दिलीप लांडे सर्वात कमी मतांनी विजयी

मुंबई नगरी टीम

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर असून,या निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मत्ताधिक्क्याने  राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार हे विजयी झाले आहेत. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर १ लाख ६५ हजार २६५ मतांच्या फरकाने विजय प्राप्त केला आहे तर शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांनी काँग्रेसचे उमेदवार नसिम खान यांचा अवघ्या ४०९ मतांनी पराभव केला आहे.

विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मतांनी निवडुन येण्याचा विक्रम राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या नावावर नोंदविला गेला आहे.बारामती मतदारसंघातून त्यांनी भाजपाचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा १ लाख ६५ हजार २६५ मतांनी पराभव केला.अजित पवार यांना सर्वाधिक १ लाख ९५ हजार ६४१ तर गोपीचंद पडळकर यांना केवळ ३० हजार ३७६ मते मिळाली.पलुस कडेगाव मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांना १ लाख ७१ हजार ४९७ तर शिवसेनेचे संजय विभूते यांना ८ हजार ९७६ मते मिळाली.विश्वजित कदम यांनी विभूते यांचा तब्बल १ लाख ६२ हजार ५२१ मतांनी पराभव केला.मुरबाड मतदारसंघातून भाजपाचे किसन कथोरे यांना १ लाख ९५ हजार ६८ तर राष्ट्रवादीचे उमेदवार प्रमोद हिंदुराव यांना केवळ ३० हजार २८ मते मिळाली. कथोरे यांनी हिंदुराव यांचा १ लाख ३६ हजार ४० मतांनी पराभव केला.लातुर ग्रामिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख यांना १ लाख ३५ हजार ६ तर शिवसेनेचे उमेदवार सचिन देशमुख यांना केवळ १३ हजार ५२४ मते मिळाली आहे. धीरज देशमुख यांनी त्याच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला  १ लाख २१ हजार ४८२ मतांनी पराभूत केले. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात विक्रमी मतांनी विजयी होतील असा अंदाज होता मात्र नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख यांचा ४९ हजार ३४४ मतांनी पराभव केला.

एकीकडे लाखांच्यावर मताधिक्क्याने काही उमेदवार विजयी झाल्याचे चित्र असतानाच काही उमेदवार काही मतांनी विजयी झाले आहेत. मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार केवळ ४०९ मतांनी विजयी झाले आहेत.त्यांनी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मंत्री नसीम खान यांचा पराभव केला आहे.दिलीप लांडे यांना ८५ हजार ८७९ तर नसीम खान यांना ८५ हजार ४७० मते मिळाली.अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार गोवर्धन चंद्रीकापुरे यांनी भाजपाचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा ७१८ मतांनी पराभव केला. गोवर्धन चंद्रीकापुरे यांना ७२ हजार ४०० तर राजकुमार बडोले यांना ७१ हजार ६८२ मते मिळाली.कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी भाजपाच्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे यांचा ८२२ मतांनी पराभव केला. आशुतोष काळे यांना ८७ हजार ५६६ तर स्नेहलता कोल्हे यांना ८६ हजार ७४४ मते मिळाली.

Previous articleशिवसेनेकडून सरकार स्थापनेसंदर्भात प्रस्ताव आल्यास काँग्रेस हा निर्णय घेणार !
Next articleधनंजय मुंडेंच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब!