सत्तेत समान वाटणीची शिवसेनेची मागणी रास्त : शरद पवार

सत्तेत समान वाटणीची शिवसेनेची मागणी रास्त : शरद पवार

मुंबई नगरी टीम

मुंबई : शिवसेना भाजपातील सत्ता संघर्ष तीव्र होवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेत समसमान वाटपाच्या सुत्रानुसार मुख्यमंत्रीपदावर अडीच वर्षांसाठी दावा केला आहे.तर दुसरीकडे शिवसेनेची मागणी योग्य असल्याचे  मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. शिवसेनेला सरकार चालवण्याचा अनुभव असल्याने त्यांची मागणी रास्तच आहे असेही पवार म्हणाले आहेत.

राज्यामध्ये भाजपाला अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांचे स्वबळाचे स्वप्न भंग झाले आहे.भाजपाला केवळ १०५ जागांवर विजय मिळवता आला.शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. राज्यात विरोधकच नसल्याचे मुख्यमंत्री आपल्या भाषणातुन सांगत होते. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या झंझावातामुळे राज्यात भाजपाला चांगलाच झटका बसला आहे. त्यामुळे आता सत्ता स्थापनेसाठी भाजपाला शिवसेनेची मदत घ्यावी लागणार आहे. निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मी भाजपाच्या सर्वच अडचणी ऐकून घेणार नाही असे खडसावत समसमान सूत्रावर कायम राहण्याचे  संकेत दिले होते. त्यांच्या या मागणीशी आपण सहमत असल्याचे पवार यांनी सांगितले. १९९५ मध्ये शिवसेना-भाजपाने समनमान वाटपाचे सूत्र वापरले असल्याने शिवसेनेला सरकार चालवण्याचा अनुभव असल्याने त्यांनी अशा मागणीवर ठाम राहण्यात काहीच चुकीचे नाही, असे पवार म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीने या निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. काँग्रेसने प्रचाराकडे दूर्लक्ष करुनही त्यांनी अपेक्षेहून चांगली कामगिरी केली असल्याचे पवार म्हणाले.मुख्यमंत्री हे प्रगल्भ नाहीत. त्यामुळे त्यांनी प्रचारादरम्यान केलेल्या टीकेकडे मी फारसे लक्ष देत नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी केलेली वक्तव्य चुकीची होती असेही पवार यांनी सांगून शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.शिवसेना आणि भाजपाची युती असल्याने शिवसेना आमच्याकडे प्रस्ताव घेऊन येणार नाही, असे पवारांनी सांगितले

Previous articleपुन्हा देवेंद्र फडणवीसच होणार मुख्यमंत्री !
Next articleविरोधी पक्षनेतेपदासाठी धनंजय मुंडे प्रबळ दावेदार