पक्ष सोडून गेलेले आज माघारी येऊ का म्हणायला लागलेत : अजित पवार
मुंबई नगरी टीम
मुंबई : अपयशाने खचून जावू नका, नव्या उमेदीने येणाऱ्या निवडणुकांच्या तयारीला लागा असे आवाहन राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केले.सर्वांनी कडवी झुंज दिली त्याबद्दल कौतुक करतानाच त्यांचे आभारही मानले.आज पक्षाची मजबूत स्थिती झाल्यानंतर निवडणुकीपूर्वी पक्ष सोडून गेलेले आज पक्षात माघारी येऊका म्हणू लागले आहेत असे अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात विधानसभेत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी पक्ष सोडून दुस-या पक्षात प्रवेश केला. पण अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा पक्ष उभा केला.जय पराजय हा सन्मानजनक असावा तो राष्ट्रवादीचा सन्मानजनक विजय झाला आहे असेही ते म्हणाले.अमोल कोल्हे, अमोल मेटकरी यांनी महाराष्ट्र पिंजून काढला त्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले.काही जिल्हयांनी ताकद दिली तर काही जिल्हयांनी ताकद दिली नाही त्यामुळे त्या जिल्ह्यात पराभव पत्करावा लागला आहे.ज्या – ज्या जिल्हयात परतीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे त्या ठिकाणी आम्ही दौरा सुरु करत आहोत. लोकांच्या मागे धावून जाण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
पाच जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असून तिथे बांधणी आतापासूनच करायला सुरूवात करा असे आवाहनही त्यांनी केले.तुमच्याच मनात संभ्रमावस्था असेल तर तुम्हाला लोकांनी का मतदान करावे असा सवाल करतानाच शरद पवार हे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. आणि तुम्ही असे वागलात तर कसे होईल असेही पवार म्हणाले.विधानसबा निवडणुकीपूर्वी पक्ष सोडून गेलेले आता पुन्हा येवू का… येवू का… असं विचारु लागले आहेत अशा शब्दात पवार यांनी गयारामांची खिल्ली उडवली.तुम्हाला पक्षाने संधी दिली आहे. पक्ष वाढवा. मागे हटू नका. त्या त्या जिल्ह्यात समीकरणे जुळवली जातील असे आवाहनही पवार यांनी केले.बारामतीत मला मत्ताधिक्य का मिळते. याची माहिती घेण्यासाठी तुम्ही बारामतीत एकदा तरी या असा सल्लाही त्यांनी दिला.पराभूत झालेले लोक विधानपरिषदेवर घ्या असं सांगायला येतील. त्यांनी त्या स्वप्नात राहू नका. अच्छे दिन येतील या भ्रमातही राहू नका असा सल्लाही पवार यांनी दिला.