पुढचे सरकार भाजपाचेच येणार : मुख्यमंत्र्यांचा दावा
मुंबई नगरी टीम
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सादर केला असून, त्यानंतर त्यांनी शिवसेनेवर नाराजी व्यक्त करीत राज्यात पुढील सरकार हे भाजपाच्या नेतृत्वात येणार असल्याचा दावा केला आहे.अडीच-अडीच वर्षाचा मुख्यमंत्री असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नव्हता असे स्पष्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर होणारी वक्तव्य दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले.आम्हाला सर्व पर्याय खुले असल्याचे सांगणा-या शिवसेनेने आमच्याशी चर्चा न करता काँग्रेस राष्ट्रवादीशी चर्चा केली अशी नाराजी व्यक्त करीत राज्यात पुढील सरकार हे भाजपाचेच येईल असा विश्वास त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.आमची खंत दूर होणार असेल तरच यापुढे चर्चा होईल असे आवाहन त्यांनी करून आम्ही युती तोडली नाही असे त्यांनी सांगत अजून चर्चेची दारं खुली असल्याचे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राजभवनावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर केला.राज्यात नविन सरकार येई पर्यंत ते राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील.त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गेल्या पाच वर्षात राज्याला प्रगतीपथावर नेण्याचे काम केल्याचे त्यांनी सांगितले.राज्यातील जनतेने महायुतीला संपूर्ण बहुमत दिले असतानाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व पर्याय खुले असल्याचे केलेले विधान धक्कादायक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युल्यावर उद्धव ठाकरे आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यात जर विषय झालेला असेल तर मला माहित नव्हते. मी यासंदर्भात अमित शाह आणि नितीन गडकरी यांना विचारले मात्र त्यांनीही असे काहीही ठरलेले नाही असे सांगितले. या बाबत समज-गैरसमज होते तर ते चर्चेने सोडवता आले असते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी यापुढे चांगले संबंझ राहतील असे सांगुन, मी त्यांना चर्चेसाठी अनेकदा फोन केले पण त्यांनी ते उचलले नाहीत. त्यांनी चर्चा थाबवली. शिवसेनेने आमच्याशी चर्चा न करता काँग्रेस राष्ट्रवादीशी चर्चा केली. विधानसभा निवडणुका ज्यांच्या विरोधात लढविल्या त्यांच्याशी शिवसेनेने चर्चा केली.मात्र त्यांनी आमच्याशी चर्चा न करण्याची भूमिका घेतली अशी खंतही मुख्यमंत्री फडणवीस व्यक्त केली.
शिवसेनेने चर्चा केली नाही याचे दु: ख वाटते,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यात शिवसेना भाजपाने सरकार स्थापन करावे असे सांगितले आहे.त्यामुळे शिवसेनेचे धोरण योग्य नाही. गेल्या गेले पंधरा दिवस ज्या प्रकाराची जाणीवपूर्वक वक्तव्य केली जात आहेत हे दुर्दैवी आहेत. अशा वक्तव्यातुन दरी वाढते असे सांगतानाच त्यांना उत्तर देण्याची क्षमता आमच्यात आहे मात्र असे करणार नाही. आम्ही जोडणारे लोक आहोत, तोडणारी नाही असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आम्हाला पुजनीय आहेत. त्यांचा आमच्याकडून कधीही अनादर होवू शकत नाही. गेल्या निवडणुकीत आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो तरी त्यांच्या विरोधात आम्ही वक्तव्य केली नाही मात्र शिवसेनेने आमच्या नेत्यांवर टिका केली.सरकारमध्ये रहायचे आणि टिका करायची हे योग्य नाही असी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. भाजपा आमदार फोडण्याचे काम करत आहेत असा आरोप केला जात आहे. माझे त्यांना खुले आव्हान आहे की, तुम्ही पुरावे द्या नाहीतर माफी मागा. सरकार स्थापन करताना आम्ही फोडाफोडीचे राजकारण करणार नाही असे सांगून,राज्यात पुढील सरकार हे भाजपाच्या नेतृत्वाखालीच येईल असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.खंत दुर होणार असेल तर चर्चा होवू शकते असे सूचक आवाहन त्यांनी युती तुटली असे मी म्हणणार नाही असेही स्पष्ट केले.शिवसेनेशी चर्चा फिसकटण्यापूर्वी मुख्यमंत्री यांनी राज्यात महायुतीचेच सरकार येईल असे सांगितले होते मात्र आज त्यांनी राज्यात भाजपाचेच सरकार येणार असे सांगितल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.