बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेचाच मुख्यमंत्री करणार

बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेचाच मुख्यमंत्री करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई :  शिवसेनाप्रमुखांना बाळासाहेब ठाकरे यांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री करणार असे ठामपणे जाहीर करत भाजप खोटेपणा करत आहे असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. जर त्यांना सर्व पर्याय खुले असतील तर आम्हाला का असू नयेत, असा सवालही त्यांनी केला. आपण अजूनही भाजपला शत्रूपक्ष मानत नाही असेही त्यांनी जाहीर केले.आम्ही खोटे ठरविणा-यांशी बोलणार नाही,अमित शहा आणि कंपनी विरोधात विश्वास नाही असा जोरदार हल्लाबोलही त्यांनी यावेळी केल्याने शिवसेना भाजपातील तणाव विकोपाला गेला आहे.

सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पत्रकार पार पडताच शिवसेना भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेवून त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला. जे लोकसभा निवडणूकीच्या वेळी सूत्र ठरले होते त्याच्या पेक्षा काहीही सूईच्या टोकावर राहील इतकंही मला काही नको. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला उल्लेख दोनदा लहान भाऊ असा केला ते कोणाला तरी खटकत आहे असेही ते म्हणाले. ठाकरे परिवार कधीही खोटं बोलत नाही हे महाराष्ट्राची जनता जाणते. खोटं बोलणा-यांना रामाचं नाव घेण्याचा काय अधिकार राम हे सत्यवचनी होते.गंगा साफ करता करता यांची मनं सत्तेच्या लालसेने कलूषित झाली आहेत असाही आरोप ठाकरे यांनी केला. महाराष्ट्राच्या जनतेचा जितका विश्वास शिवसेना प्रमुख व त्यांच्या परिवारावर आहे तितका अमित शहा आणि कंपनीवर नाही असा हल्लाही त्यांनी चढविला.उद्धव ठाकरे यांनी यावेळी राम मंदिर प्रकरणाचा उल्लेख केला जो काही निकाल येईल तो न्यायालयाचा असेल त्याचे श्रेय कोणीही घेऊ नये त्याच्याशी सरकारचा संबंध नाही. जे नाणार प्रकल्प परत आणू असे म्हणू शकतात ते ३७० कलम परत आणू असेही म्हणतील अशी कडवट टिकाही करतानाच रा. स्व. संघाला भाजपचे हे हिंदुत्व मान्य आहे का, असा सवालही त्यांनी केला.

आम्ही शहा मोदींवर टिका केली नाही,असे सांगतानाच उदयनराजे भोसले यांनी केलेली टिका त्यांना चालते का असा सवालही त्यांनी यावेळी केला. मला खोटं ठरवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोलणार नाही. माझ्यावर खोटेपणाचा आरोप केला ते दुर्दैवी आहे. काळजीवाहूंनी असा काही प्रयत्न करु नये असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मी खोटेपणा केलेला नाही तर भाजपा खोटेपणा करत आहे. सातत्याने भूमिका बदलण्याचा प्रकार भाजपाने केला आहे. आम्ही दिलेला शब्द फिरवलेला नाही. मातोश्रीवर जेव्हा भाजपाध्यक्ष अमित शाह आले होते तेव्हा जे काही ठरले होते ते देवेंद्र फडणवीस यांना माहित आहे तरीही ते मला खोटे ठरवत आहेत असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला भाऊ मानले आहे त्यामुळे त्यांच्यावर टिका का करू असे ठाकरे यांनी सांगून शब्द देवून फिरवणारे आम्ही नाही, चुकीच्या माणसांसोबत गेलो असे त्यांनी सांगितेल. शब्द द्यायचा आणि वेळ मारुन फिरवायचा हे भाजपाचे धोरण आहे आमचे नाही असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.आम्हाला खोटे ठरविणा-यांशी बोलणार नाही, भाजपाने लवकरात लवकर सरकार स्थापन करावे नाही तर आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत असा इशारा त्यांनी देवून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

Previous articleपुढचे सरकार भाजपाचेच येणार : मुख्यमंत्र्यांचा दावा
Next articleभाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण ; बहुमत सिद्ध करणार का ?