सर्वच पक्षांना आमदार फुटीची धास्ती

सर्वच पक्षांना आमदार फुटीची धास्ती

मुंबई नगरी टीम

मुंबई: सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असणारे संख्याबळ भाजपाकडे नसल्याने भाजपाने आज राज्यपालांची भेट घेवून सत्ता स्थापनेचा दावा न करता सध्या राज्यात निर्माण झालेल्या सत्तापेचावर चर्चा केली आहे.तर दुसरीकडे शिवना आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने राज्यात सत्तापेच निर्माण झाला असतानाच अनेक पक्षांना आमदार फुटीची चिंता सतावत असल्याने काहीनी आपल्या आमदारांना सुरक्षित स्थळी हलवले आहेत तर काँग्रेस आणि भाजपने आपल्या आमदारांना मुंबईत पोहचण्याचे फर्मान काढले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तर भाजपाकडून आमदारांना फोन केल्याचा दावा करीत त्यांना प्रलोभन दाखवले जात असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.

सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने भाजपाने आज सत्ता स्थापनेचा दावा केला नाही. तर राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा शिवसेनेने केला असून, सावधगिरी बाळगत आपल्या सर्व आमदारांना रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवले आहे.दुसरीकडे भाजपाने आणि काँग्रेसने आपल्या आमदारांना मुंबईत पोहचण्याचे आदेश दिले आहेत.भाजपकडून आमच्या काही आमदारांना फोन येत आहेत. त्यांना प्रलोभन दाखवले जात आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.कोणत्याही पक्षातून आमदार फोडण्याचा प्रयत्न झाल्यास सर्व पक्ष एकत्र येऊन फुटणा-या आमदारास पराभूत करू असा विश्वासही या नेत्यांनी व्यक्त केला.राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून आता फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या आमदारांना भाजपकडून फोन केले जात असल्याचा त्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. चार दिवसांच्या शेतकरी संवाद दौऱ्यावर निघालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला दौरा अर्धवट सोडला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहून त्यांनी तातडीने मुंबईत परतण्याचा निर्णय घेतला आहे.

Previous articleमुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार ; शिवसेना भूमिकेवर ठाम
Next articleपुढचे सरकार भाजपाचेच येणार : मुख्यमंत्र्यांचा दावा