भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण ; बहुमत सिद्ध करणार का ?
मुंबई नगरी टीम
मुंबई : अपेक्षेप्रमाणे राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे.म्हणजेच तुम्ही सत्ता स्थापन करू शकता का याचा अंदाज घ्या आणि आम्हाला सांगा असं निमंत्रण दिले आहे.त्यामुळे राज्यात पुन्हा फडणवीस सरकार येणार असले तरी अल्पमतातील सरकार स्थापन करायचे किंवा नाही याबाबत उद्या रविवारी भाजपाच्या होणा-या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. राज्यात नवे सरकार कोणाचे याची चावी सध्या राष्ट्रवादीकडे असल्याने शरद पवार यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेवून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर केल्यानंतर अपेक्षेप्रमाणे राज्यपालांनी राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले आहे.राज्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्यांच्याकडे बहुमताचा आकडा गाठणारे संख्याबळ नसल्याने भाजपाच्या उद्या रविवारी होणा-या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले आहे. मात्र अडीच अडीच वर्षाच्या फॅार्मुल्यामुळे शिवसेना आणि भाजपातील वाद विकोपाला गेला आहे.तर काल मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील रोख पाहता हे दोन पक्ष एकत्र येण्याची शक्यता मावळली असल्याची चर्चा आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकाला दिवशी राष्ट्रवादीने भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. मात्र आता तशी परिस्थिती राहिली नाही.भाजपाला धडा शिकवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित येण्याची शक्यता असल्याने भाजपा निमंत्रण स्वीकारणार की नकार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्रीपदावर अडून राहिलेल्या शिवसेनेवर दबाव टाकण्यासाठी भाजपा सत्ता स्थापन करण्याची जास्त शक्यता आहे, त्याप्रमाणे भाजपा उद्या राज्यपालांची भेट घेवून सरकार स्थापन करण्यासंदर्भात चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडेल. या मध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील.शिवसेनेवर दबाव वाढविण्यासाठी मित्र पक्षांसह भाजपाचे मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर राज्य विधिमंडळाचे तीन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात येईल. या तीन दिवसाच्या अधिवेशनात पहिल्या दोन दिवसात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होईल. तिस-या दिवशी विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणुक पार पडेल. या निवडणुकीत भाजपाची कसोटी लागेल. पुरेसे बहुमत नसतानाही गेल्या विधानसभेत भाजपाने राष्ट्रवादीच्या मदतीने आवाजी मतदानाने या निवडणुकीत बाजी मारून शिवसेनेला धक्का दिला होता. मात्र या निवडणुकीत भाजपाचे संख्याबळ घटल्याने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतच भाजपाची कसोटी लागणार आहे.शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सहमतीने अध्यक्षपदासाठी उमेदवार दिल्यास हे भाजपापुढे मोठे आव्हान ठरू शकते. या घडामोडीनंतर राज्यपाल भाजपला पुढील पंधरा दिवसात बहुमत सिद्ध करण्यास सांगतील.त्यामुळे भाजपा सरकार वाचविणार का अशी चर्चा आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाला १०५, शिवसेना ५६, राष्ट्रवादी काँग्रेसला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत.बहुजन विकास आघाडी ३,एमआयएम,समाजवादी पार्टी,प्रहार जनशक्ती पार्टी यांना प्रत्येकी २ जागा,स्वाभीमानी पक्ष,रासप,शेकाप,मनसे,क्रांतीकारी शेतकरी पक्ष जनसुराज्य पक्ष,सापीआय या पक्षांना प्रत्येकी १ जागा मिळाली आहे. तर १३ जागांवर अपक्ष निवडून आले आहेत. भाजपाला १३ अपक्षांनी तर शिवसेनेला ८ अपक्षांनी पाठिंबा दिला आहे.भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याने सत्ता स्थापन करण्याचा दावा का करीत नाही असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी करून भाजपाने सरकार स्थापन करून दाखवावे असे आव्हान दिल्याने उद्या होणा-या भाजपाच्या कोअर कमिटीत कोणता निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपाने सत्ता स्थापनेस असमर्थता दर्शविल्यास शिवसेनेला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले जावू शकते.