राज्यातील नवे सरकार पाच वर्षे चालणार : शरद पवार

राज्यातील नवे सरकार पाच वर्षे चालणार : शरद पवार

मुंबई नगरी टीम

नागपूर: राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याचा प्रश्नच नसून, राज्यात लवकरच सरकार स्थापन होणार असून, हे सरकार पाच वर्षे चालणार असल्याचा ठाम विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. राज्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी विदर्भाच्या दौ-यावर असलेल्या पवार यांनी आज नागपूर मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.

शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन दिवस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे विदर्भाच्या दौ-यावर होते. त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार येईल असे त्यांचे नेते म्हणत आहेत या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.सध्या तरी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन एवढच माझ्या डोक्यात आहे, असे ते म्हणाले. राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याचा प्रश्नच नाही. राज्यात लवकरच नवे सरकार स्थापन होणार असून, ते पाच वर्षे चालेल असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.राज्यात तीन पक्षांचे सरकार चालू शकत नसल्याने पुन्हा राज्यात भाजपाचे सरकार येईल. राज्यात तीन पक्षांचे सरकार आले तरी ते सहा महिने टिकणार नाही, असे माजी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते.या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हमाले की, फडणवीसांविषयी जेवढी माहिती आहे, त्यात ते ज्योतिषशास्त्राचेही अभ्यासक आहेत हे माहीत नव्हते, असा टोला त्यांनी लगावला.

विदर्भातील जी काही महत्वाची पिकं आहेत त्यांचे नुकसान झाले आहे.त्यामध्ये फळबागांमध्ये संत्री, मोसंबी यांच्यावर परिणाम आहे. धानाचे पीक आहे त्यावर परिणाम झाला आहे. कपाशी, सोयाबीन, ज्वारी आहे. अभूतपूर्व असे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये संत्र्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या नुकसानीची आकडेवारी पेक्षा जास्त शेतक-यांचे नुकसान झाले आहे आणि ती आकडेवारी मोठी आहे.अतिवृष्टीमुळे संत्र्यांवर गळ नावाचा रोग झाला आहे. यामुळे संत्री, मोसंबीची फळं गळून पडत आहे. ६० ते ७० टक्के फळं गळून पडली आहेत. त्याचा आता काही उपयोग नाही. तो वेचून काढायला आणखी खर्च येतो. अशा संकटात संत्रा उत्पादक सापडला आहे असेही शरद पवार यांनी सांगितले.मोसंबी आणि संत्र्यावर एक रोग येतो त्याला ड्रायबॅक म्हणतात. यामध्ये पाने सुकुन गळून पडतात आणि हाच रोग या पिकांवर आलेला आहे असे सांगतानाच या सर्व उत्पादकांना काय आणि कशी मदत करता येईल अशी पाऊले टाकली जातील आणि राज्यसरकारचे प्रतिनिधी सुद्धा बोलावून या नुकसानीला सामोरे जाताना यंत्रणा कशी उभारावी याची चर्चा या बैठकीत केली जाणार आहे अशी माहितीही पवार यांनी यावेळी दिली.

शेतक-यांचे जे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामध्ये दोन भाग असून शेतकर्‍यांनी बॅंकचे कर्ज काढले आहे आणि पीक गेले आहे. मात्र कर्ज डोक्यावर तसेच राहिले आहे. त्यांना कर्जमाफी मिळणे आणि दुसरा भाग कर्जमाफीशिवाय समजा कर्जमाफी झाली आणि यंदाच्या वर्षातील पीक गेल्यानंतर पुढच्या वर्षीचं पीक घेण्यासंदर्भात भांडवली गुंतवणूक कुठुन करायची त्यासाठी केंद्र सरकारकडून,अर्थ मंत्रालयाकडून काही रक्कम मदतीसाठी शुन्य व्याजाने किंवा कमी व्याजाने, दिर्घ हप्त्याने देणं शक्य आहे का हाही प्रयत्न केला जाईल आणि त्यासाठी अर्थमंत्रालयासोबत बैठक घेणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

Previous articleपाच वर्षात सरकारने राज्याला दिवाळखोरीकडे नेले: छगन भुजबळ
Next articleभाजपाशिवाय कोणीही सरकार स्थापन करू शकत नाही : चंद्रकांत पाटील