लाल दिव्यापेक्षा परळीच्या प्रत्येक घरात विकासाचा दिवा लावायचा आहे

लाल दिव्यापेक्षा परळीच्या प्रत्येक घरात विकासाचा दिवा लावायचा आहे

मुंबई नगरी टीम

परळी  :  सत्तेच्या लाल दिव्यापेक्षा मतदारसंघातील प्रत्येक घरात विकासाचा दिवा मला लावायचा असल्याचे प्रतिपादन परळी विधानसभेचे नवनिर्वाचित आ.धनंजय मुंडे यांनी केले. राज्यात कोणाचेही सरकार बनो त्यात परळीचा वाटा सर्वात महत्वाचा राहील आणि तुमच्या मनात जे आहे तेच होईल असे म्हणत आपण सत्तेत येणार असल्याचे संकेतही त्यांनी देतानाच मतदारसंघातील शेवटच्या शेतक-याला पीक विमा आणि परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असा निर्धारही मुंडे यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणूकीच्या नंतर राज्यात निर्माण झालेल्या राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर सत्ता संघर्षात महत्वाची भूमिका बजवायची असल्यामुळे मागील १५ दिवसांपर्यंत मुंबईत असलेले मुंडे आज प्रथमच परळीत आले. कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी हालगे गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते, हा विजय माझा नव्हे तर तुमचा विजय आहे. गेल्या १० वर्षाच्या अथक परिश्रमातून हा विजय साकारला आहे, तुमच्या सहकार्याचे आणि मेहनतीचे मोल होऊ शकत नाही, तुमच्या ऊपकाराची परतफेड होऊ शकत असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. निवडणूकीतील कार्यकर्त्यांची मेहनत, परिश्रम आणि काही प्रसंग सांगतानाच त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांचेही आभार व्यक्त केले.

परळीकरांनी दाखवलेल्या विश्वासामुळे हा विजय मिळाला असल्याने आपण त्याची परतफेड करण्यासाठी त्याच दिवशी पासून कामाला लागलो आहोत. परळी-अंबाजोगाई रस्त्याच्या कामाचे रि टेंडर करण्यासंबंधी मतमोजणीच्या दिवशीच अधिका-यांना सूचित केले, ही प्रक्रिया पूर्ण झाली असून, पुढील १ महिन्यात काम सुरू होऊन लवकरच रस्त्याचे काम पुर्णत्वास जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मतदारसंघातील प्रमुख गावांमध्ये जनसंपर्क कार्यालय सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली.या बैठकीत मतदारसंघाचा आभार दौरा काढण्याच्या विषयावर चर्चा होणार होती, मात्र सर्वच वक्त्यांनी आणि कार्यकर्त्यांनी साहेब मंत्री होऊनच परळीत या नंतरच आपण दौरा काढून जनतेचे आभार व्यक्त करू अशी गळ त्यांना घातली.

Previous articleराज्यातील सत्तेचा तिढा कायम
Next article१८ जिल्हा परिषदांचे अध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित