दुचाकीवरून २०० किमीचा प्रवास करीत तरूण शेतक-याने शरद पवारांसाठी आणला भाजीपाला
मुंबई नगरी टीम
मुंबई : जाणता राजा म्हणून महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात परिचित असणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ग्रामिण भागातील शेतकरी जीवापाड प्रेम करतो.पवार यांच्यावरही प्रेम करणारे शेतकरी राज्याच्या विविध भागात आहेत.सध्या राज्यातील सत्तापेच सोडविण्यात महत्वाची भूमिका बजावण्यात व्यस्त असणा-या शरद पवार यांच्यासाठी एक तरूण शेतकरी २०० किमीचा दुचाकीवरून प्रवास करीत त्यांच्या प्रेमापोटी गावाकडचा ताजा भाजीपाला घेवून सिल्वर ओक निवासस्थानी पोहचला.आपल्यावरील या तरूण शेतक-याचे प्रेम पाहून पवारांनी या तरूण शेतक-यासोबत फोटो काढून तो फेसबुकवर शेअर केला आहे.
राज्यात सुरू असणारा सत्तेचा तिढा सोडविण्यात शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व्यस्त आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत. सत्तापेच सोडविण्यासाठी गेली दोन दिवस ते नवी दिल्लीतील बैठकांमध्ये व्यस्त होते. त्यानंतर काल रात्री मुंबईत परतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेवून चर्चा केली.आजही मुंबईत महत्वाच्या नेत्यांशी बैठकांचे नियोजन होते.आज मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी राज्यातील राजकारणावर खलबत सुरू असतानाच त्यांच्या निवासस्थानी त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा एक तरूण शेतकरी धडकला.नेहमीच अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून जाणारे आणि शेतकऱ्यांबद्दल जिव्हाळा असलेले माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही तेवढेच प्रेम करणारे शेतकरी राज्याच्या विविध बागात आहेत.सुनील सुक्रे या शिरूर तालुक्यातील केंदूर गावच्या तरूण शेतकऱ्याने २०० किलोमीटर दुचाकीने प्रवास करून शरद पवार यांच्या प्रेमापोटी गावाकडचा ताजा भाजीपाला त्यांच्यासाठी आणला होता. ताज्या मेथीच्या पेंडींसह अनेक ताज्या भाज्या सुनील सुक्रे या तरूण शेतक-याने पवार यांना दिल्या.या भाज्यांसह एका थैलीत या तरूण शेतक-याने गावाकडची गोड बोरं सुद्धा आणली.त्या बोरांचा आस्वाद राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घेतला.यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या तरूण शेतक-यासोबचा फोटो फेसबुकवर शेअर करीत, अशा काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रेम हीच माझी शक्ती आहे अशी भावना व्यक्त केली.