नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून विधानसभेत गदारोळ
मुंबई नगरी टीम
नागपूर: संसदेत बहुमताने संमत झालेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याची राज्यात अंमलबजावणी होऊ नये अशी आग्रही मागणी सत्तारुढ पक्षांचे ज्येष्ठ सदस्य व काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आज विधानसभेत केल्याने प्रचंड गदारोळ झाला.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या कायद्याचे जोरदार समर्थन करताना केंद्राच्या कायद्याचे पालन राज्याला करावेच लागते याची आठवण करून दिली.चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे सभागृहात झालेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले.
विधानसभेत आज स्थगन प्रस्ताव उपस्थित करीत काँग्रेसचे सदस्य अशोक चव्हाण यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभर व राज्यातही निदर्शने होत आहेत,विद्यार्थ्यांवर लाठीमार झाले आहेत. या कायद्याला न्यायालयातही आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे त्याची राज्यात अंमलबजावणी करू नये अशी मागणी केली.चव्हाण हे बोलत असतानाच विरोधी सदस्य उभे राहून गदारोळ करू लागले न्यायालयाने काहीही नियमबाह्य ठरविलेले नाही असे विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण यांनी अशोक चव्हाण यांचा मुद्दा फक्त अंमलबजावणी नको इतकाच आहे असे वक्तव्य केले. तेव्हा फडणविस यांनी न्यायालयाने काहीही नियमबाह्य ठरवलेले नाही याकडे लक्ष वेधले.सभागृहाच्या कामकाजात विरोधी सदस्य व्यत्यय आणित आहेत हे चालवून घेऊ नये अशी विनंती चव्हाण केली.या गदारोळामुळे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले.विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी हा कायदा नागरिकत्व देणारा आहे.या देशातील नागरिकांचे नागरिकत्व काढून घेण्यासाठी नाही अशी माहिती दिली. त्यानंतर अध्यक्ष नाना पटोले यांनी या चर्चेदरम्यान जर काही असंवेधानिक विधाने झाली असतील तर ते वगळण्याचे आदेश दिले.